
गरज भासल्यास क्रांती रेडकर यांच्या पाठिशी मनसे उभी राहिल’: अमेय खोपकर
मुंबई : प्रतिनिधी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला झालेली अटक राष्ट्रवादीला चांगलीच झोंबली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे वारंवार एनसीबीला टार्गेट करत आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर तसेच गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी गरज भासल्यास मनसे क्रांती रेडकर यांच्या पाठिशी उभी राहणार असल्याचे म्हंटले आहे.
याआधी क्रांती रेडकर म्हणाल्या होत्या की कोणीच पुढे येत नाही. यावरून अमेय खोपकर म्हणाले की, गरज भासल्यास क्रांती रेडकर यांच्या पाठिशी मनसे उभी राहिल. मागील काही दिवसांपासून एनसीबीवर टीका होत आहे. एकीकडे बॉलिवूडमधील कलाकार शाहरूख खानला पाठिंबा दर्शवत आहेत. मात्र एनसीबीच्या बाजूने कोणीच उभे नाही. यावरून आता मनसेने क्रांती रेडकर यांना पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झाल्याचा थेट आरोप नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आले. मात्र समीर वानखेडे यांनी मलिकांनी केलेले आरोप हे सर्व खोटे असल्याचे स्पष्ट केले.



