
महालक्ष्मी मंदिरात अंनिसचा ‘जागर स्त्रीशक्तीचा’; चमत्कारांच्या प्रात्यक्षिकांतून अंधश्रद्धेवर प्रबोधन
मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दादर शाखेच्या वतीने आणि राज्य महिला सहभाग विभागाच्या आयोजनातून नवरात्रोत्सवानिमित्त ‘जागर स्त्रीशक्तीचा’ हा प्रबोधनात्मक उपक्रम महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, परळ पूर्व, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता
फुलेंच्या विचारांची ज्योत, स्त्रीमुक्तीची वाट’ या अभियानांतर्गत आयोजित या कार्यक्रमात ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा’ या विषयावर प्रबोधन करण्यात आले. यावेळी प्रोजेक्टरच्या माध्यमातून विषयाची मांडणी करत विविध चमत्कारांची प्रात्यक्षिके सादर करून त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी विजय परब, नंदकिशोर तळाशीलकर आणि दादर शाखेच्या कार्याध्यक्ष अर्चना सोनावणे, रुपेश इंगळे, मंदिराचे ट्रस्टी विद्यानंद वाईनकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नंदकिशोर तळाशीलकर यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतील फरक स्पष्ट केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देव आणि धर्माला विरोध नसून, त्यांच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला विरोध आहे, असे त्यांनी नमूद केले.
अर्चना सोनावणे यांनी देवी अंगात आल्याचा दावा करून जळता कापूर खाणे, भूत उतरविण्याचे प्रकार तसेच नारळातून करणी झाल्याचे दावे यांमागील सत्य प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून उलगडून दाखवले. या मागील हातचलाखी आणि वैज्ञानिक कारणे समजावून सांगत उपस्थितांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यात आले
रुपेश इंगळे यांनी विविध चमत्कारांची प्रात्यक्षिके सादर करून त्यांमागील रहस्य उलगडले. प्रत्येक चमत्काराकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. असे नमुद केले.
महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिला, पुरुष, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच नवविवाहित जोडप्यांनीही थांबून या प्रबोधनपर कार्यक्रम पाहीला.
मंदिर परिसरात थेट अंधश्रद्धा निर्मूलनाचा विषय मांडून प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यात आल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
*******



