
मोठी बातमी : मार्चअखेरीस 18 महापालिका निवडणुकांची चिन्हं, ओबीसी आरक्षण वगळून निवडणुकांची तयारी…
मुंबई प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूरसह 18 महापालिका निवडणुका (Municipal Corporation Election) ओबीसी आरक्षण (OBC Reservation) वगळून घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली आहे. येत्या 7 जानेवारीपर्यंत सर्वच महापालिकांना सुधारित आराखड्यानुसार आरक्षण निश्चितीसाठी सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकसंख्या तसेच अन्य सांख्यिकी माहिती पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर साधारण पुढील दोन ते चार दिवसांत प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. जानेवारीअखेर तो अंतिम झाल्यास एक फेब्रुवारीला महापालिका निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू शकते, तर मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात महापालिका निवडणुकांचा धुरळा उडण्याची चिन्हं आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर रोजी एक आदेश काढून ओबीसी आरक्षणाविना राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुका होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ओबीसी आरक्षणाचा निर्णय हाेईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याच्या निर्णयाचा ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात मांडल्यानंतर भाजपसह सर्वपक्षीयांनी समर्थन दिले होते. यासंदर्भातील ठराव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.



