
हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल..
अधिष्ठात्याला टॉयलेट साफ करायला लावणे अंगलट
राज्य प्रतिनिधी
शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील मृत्यूतांडवानंतर अनेक नेत्यांनी रुग्णालयाला भेट दिली. यामध्ये शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हे देखील होते. मात्र रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याकडून टॉयलेट स्वच्छ करुन घेतलं. मात्र ही कृती त्यांना महागात पडली आहे. कारण खासदार पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांना टॉयलेट साफ करायला लावले होते. हे प्रकरण हेमंत पाटील यांच्या अंगलट आले.
या प्ररकणी अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांच्या तक्रारीवरुन खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणानंतर खासदार हेमंत पाटील रुग्णालयात होते. त्यांनी अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांना त्यांच्या कार्यालयातील आणि रुग्णालयातील एका वार्डातील शौचालयाची सफाई करायला लावली.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा हेमंत पाटील आणि अन्य 10 ते 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक यांनी दिली आहे



