
गुढी पाडवा, मतदान वाढवा’;जिल्हा प्रशासनाचा सोमवारी (दि.८) उपक्रम
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:
– लोकसभा निवडणूकीत लोकांनी अधिक संख़्येने मतदान करावे यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून जनजागृती करीत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या औचित्यांची उपयुक्तता साधली जात आहे. मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवसाचे औचित्य साधून ‘गुढी पाडवा, मतदान वाढवा,’ हा उपक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून राबविला जाणार आहे.
येत्या मंगळवार दि.९ रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी ‘गुढीपाडवा’ हा सण आहे. या सणाला मतदार जनजागृतीची जोड देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सर्व अधिकारी व कर्मचारी मतदान जनजागृती – स्वीप चे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. याच निमित्ताने दि.८ रोजी सकाळी ९ ते १० दरम्यान एकाच वेळी संपूर्ण जिल्हाभरात कार्यक्रमाचे आयोजन करुन मतदार जनजागृती करण्यात यावी. प्रत्येक तालुक्यातील संपूर्ण गावांमध्येही हा उपक्रम राबवावा. गावकऱ्यांकडून मतदान करण्यासंदर्भात शपथ वदवून घेतली जाईल. तसेच मतदानाचा दिनांक १३ मे यादिवशी आपला मतदानासाठीचा वेळ राखीव ठेवावा, असे आवाहनही लोकांना करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. गाव पातळी, तालुका पातळी, उपविभागीय, जिल्हा पातळीवर अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे आयोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले आहेत.
०००००



