
सर्वोच्च न्यायालयामार्फत 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 कालावधीत विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन – सचिव न्या. ईश्वर सुर्यवंशी
ठाणे,दि.12 (जिमाका) – सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दि.29 जुलै 2024 ते 03 ऑगस्ट 2024 या कालावधीत सर्वोच्च न्यायालयातील विविध प्रकरणांतील बहुतांश प्रलंबित दावे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार असून त्यांचा निपटारा करुन न्यायदानाचे काम जलदगतीने होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आपसी सामंजस्यातून निकाली काढण्यासाठी लोकअदालत हे प्रभावी माध्यम आहे. लोकअदालतीच्या माध्यमातून अनेक प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढली जातात. लोकअदालतच्या निवाड्याविरुध्द अपिल नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. खटल्यामध्ये साक्षीपुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. तसेच कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. तालुका व जिल्हा न्यायालयाप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयात देखील प्रलंबित प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याबाबत विचार करुन पक्षकारांमध्ये सामंजस्याने कायमस्वरुपी वाद मिटवण्याच्या दृष्टीने मा. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत मा. सर्वोच्च न्यायालय यांनी पुढाकार घेतलेला असून दि.29 जुलै 2024 ते 03 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालतीचे आयोजन करीत आहे.
याच अनुषंगाने जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यांच्याकरीता आपली प्रकरणे आपसी समन्वयातून तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने उपलब्ध करुन दिलेल्या या संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर का. सुर्यवंशी यांनी केले आहे.
0000000



