
वसईत विना परवाना आयुर्वेदिक औषध उत्पादन करणाऱ्या पेढीवर एफडीएचा छापा..
मुंबई- ( प्रतिनिधी )विना परवाना आयुर्वेदिक औषध उत्पादन केल्या प्रकरणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने
पालघर जिल्ह्यातील वसई येथील मे .गहरवार फार्मा प्रोडक्ट्स प्रा. लि.येथे धाड टाकुन १ करोड ४१ लाखांची औषधे व तो तयार करण्यासाठी लागणाऱ्या मशिनरी, कच्चा माल, पॅकिंग मटेरियल, लेबल्स, इत्यादी वस्तु जप्त केल्या आहे.
मे. गहरवार फार्मा प्रोडक्ट्स प्रा. लि. पालघर यांनी हरयाणा येथे आयुर्वेदिक औषध उत्पादनासाठी नियमाप्रमाणे परवाना घेतला होता.मात्र तो परवाना 14 मे 2024 रोजी रद्द झाला होता . तरी सदर उत्पादक वसई येथे याच परवानाचा उल्लेख करून, वसई येथे औषध उत्पादन करीत होते.तसेच ते
हरियाणा येथे घेतलेल्या परवाना अंतर्गत उत्पादीत औषधे मे. ओंकार फार्मा जालंधर यांना विक्री – वितरीत करीत असल्याचे दाखवीत होते, परंतु सदर संस्था वसई येथे असुन या ठिकाणाहुन बिलावर जालंधर येथील पत्त्याचा उल्लेख करून औषध विक्री करीत होते.
मे. ओंकार फार्मा यांच्या वसई येथे धाडीत काही असे ही औषधे आढळुन आले, ज्याच्या लेबल वर मे. गहरवार फार्मा प्रोडक्ट्स प्रा. लि., नवघर वसई जिल्हा पालघर यांचे उत्पादक म्हणुन नाव नमुद होते. त्यांची उत्पादन जानेवारी २०२४ अशी नमुद केली होती. या ठिकाणी मे. ऋषभ मेडिसीन यांचा आयुर्वेदिक औषध उत्पादन करिता परवाना होता, व तो २०२२ वर्षीच रद्द झाला होता.
ह्याच पेढीविरुद्ध मार्च २०२४ मध्ये ही नवघर वसई जि. पालघर येथे विना परवाना आयुर्वेदिक औषध उत्पादन केल्या प्रकरणी, तसेच आयुर्वेदिक औषधामध्ये एलोपॅथी औषध मिश्रण केल्या प्रकरणी औषध जप्तीची कारवाई करण्यात आली होती, तसेच त्यांच्या भगिनी संस्था मे. ऋषभ मेडिसिन नवघर वसई, जि. पालघर यांच्या विरुध्द २०२१ मध्ये आयुर्वेदिक औषधामध्ये एलोपॅथी औषध मिश्रण केल्या प्रकरणी औषध जप्ती ची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी पेढी विरुद्ध कोर्टात खटला दाखल केला आहेत.
औषध अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागास प्राप्त माहितीच्या आधारे सदर उत्पादकाकडे धाड टाकण्यात आली. या धाडी मध्ये प्राप्त माहिती प्रमाणे, सदर पेढीला पंचकुला, हरयाणा येथे आयुर्वेदिक औषध उत्पादन करण्याकरिता उसनवार परवाना मंजूर आहे, परंतु सदर पेढी पंचकुला हरयाणा ऐवजी वसई (पु) येथे सदर आयुर्वेदिक औषधे उत्पादित करत होती, या ठिकाणी आयुर्वेदिक औषध उत्पादनाकरीता परवाना मंजूर नाही. यापूर्वी सेप्टेम्बर २०२१ मध्ये त्यांच्या भगिनी संस्था मे. रुषभ मेडिसिन्स, नवघर वसई (पु), हे आयुर्वेदिक औषधामध्ये अॅलोपथी औषध टाकुन आयुर्वेदिक औषधाचे उत्पादन करीत असल्याचे माहिती मिळाल्यावरुन त्यांच्या जागी धाड टाकुन औषधे जप्त करण्यात आले होते.
सदर उत्पादकाकडे पुढील तपास काम सुरु आहे व तपास पूर्ण झाल्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निश्चित केले आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यु काळे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे, सह आयुक्त (कोकण विभाग) नरेंद्र सुपे, सह आयुक्त (बृहन मुंबई) विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक योगेंद्र पोळ, नितीन आहेर व ठाणे औषध निरीक्षक कैलाश खापेकर , सहायक आयुक्त प्रकाश म्हानवर, मुकुंद डोंगळीकर, दीपक मालपुरे, रोहित राठोड, पालघर कार्यालयाचे सहायक आयुक्त महेश गाडेकर, उमेश घरोटे व पालघर, ठाणे व बृहनमुंबई विभागातील औषध निरीक्षक किशोर राजने, श्रीमती शुभांगी भुजबळ, नितीन आहेर, राकेश एडलावर, प्रविण राउत, श्रीमती पुनम साळगावकर, राजश्री शिंदे, सुनील गवळी, प्रेमदास साखरे यांनी सहभाग घेतला । व औषध निरीक्षक शशिकांत यादव यांचा मोठा हातभार होता.



