
पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील मुसळधारेने १७ धरणे तुडूंब भरून वाहू लागले.
.
राज्य प्रतिनिधी
.पावसाळ्याचे जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहे. या कालावधीत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडला आहे. विशेषतः धरण क्षेत्रांत पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील २६ धरणांपैकी आतापर्यंत जवळपास १७ धरणे भरली आहेत
पुणे जिल्ह्यातील २६ धरणांपैकी आतापर्यंत जवळपास १७ धरणे भरली आहेत. सर्व धरणांत एकूण १७०.३२ टीएमसी म्हणजेच ८६ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
यंदा जून महिन्यात कमी पाऊस झाला होता. त्यामुळे चालू वर्षी पुरेसा पडतो की नाही, अशी स्थिती झाली होती. परंतु सात जूनच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यानंतर जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होता. परंतु दुसऱ्या आठवड्यात पावसाने चांगलाच जोर लावून धरला.
जिल्ह्यात एकूण धरणांची उपयुक्त पाणीसाठा क्षमता ही १९८.३२ टीएमसी एवढी आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत या धरणांत ११४.५६ टीएमसी म्हणजेच ५७ टक्के एवढा पाणीसाठा झाला होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे.
सध्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांत पाण्याची आवक वाढली आहे. तर एक जूनपासून मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरणांत ४४.८२ टीएमसी एवढा पाणीसाठा नव्याने दाखल झाला आहे. नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडीवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणांत ६५.२२ टीएमसी, तर कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड या धरणांत ३२.५२ टीएमसी, याशिवाय उजनी ७७.१० टीएमसी, मुळशी २४.८० टीएमसी एवढा नव्याने पाणीसाठा दाखल झाला आहे.



