
शासकीय योजनांचे लाभ व कायदेविषयक साक्षरतेसाठी महाशिबिराचे आयोजन
ठाणे, प्रतिनिधी(जिमाका) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे व तालुका विधी सेवा समिती, बेलापूर आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.०१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता राजर्षी शाहू महाराज विद्यालय, नवी मुंबई म.न.पा. शाळा क्र.५५, डॉ.आंबेडकर नगर, रबाळे एमआयडीसी, नवी मुंबई येथे नागरिकांकरिता कायदेविषयक साक्षरता शिबिराद्वारे विधी सेवा व सहाय्य तसेच शासन स्तरावरील विविध शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ देण्याकरिता एकाच छताखाली जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख श्रीनिवास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी शासनाद्वारे वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना कार्यान्वित केल्या जातात. या योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महाशिबिरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, कामगार आयुक्तालय, तसेच सामाजिक क्षेत्रात विविध स्तरावर काम करणाऱ्या सामाजिक संस्था सहभाग घेणार आहेत.
या शिबिरात सर्व शासकीय विभागांमध्ये नागरिकांकरिता असलेल्या सर्व योजनांसाठी स्वतंत्र स्टॉल व तज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येणार असून सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे व त्या योजनांचा लाभ मिळवून देणे, हा महाशिबिराचा उद्देश असून या महाशिबिरासाठी सर्व नागरिकांना मोफत प्रवेश आहे.
तरी या सूवर्णसंधीचा लाभ घेण्याकरिता सर्व स्तरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सामील होण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे चे सचिव श्री. ईश्वर सूर्यवंशी यांनी केले आहे.
0000000000
वृ.क्र.722/2024



