
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना;आधार प्रमाणिकरणासाठी दि.३० पर्यंत मुदतवाढ..
छत्रपती संभाजीनगर, :-महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 प्रोत्साहनपर लाभ योजने अंतर्गत लाभास पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणाची सुविधा दि.18 सप्टेंबर पर्यंत उपलब्ध करुन दिली होती तथापि, अद्यापही राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी असल्यामुळे आधार प्रमाणिकरणाची मुदत दि. 30 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे,असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते यांनी कळविले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेस पात्र असलेल्या संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण करणे अत्यावश्यक व बंधनकारक असुन आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ही अंतिमसंधी आहे. आधार प्रमाणिकरणानंतर पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना महाआयटी मार्फत SMS देण्यात आला आहे. तरी योजनेअंतर्गत विशिष्ट क्रमांकासह यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या परंतु अद्याप आधार प्रमाणीकरण व न झालेल्या मयत, वारस लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण दि.30 पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरणाची सुविधा बंद होणार आहे. या कालावधीत आधार प्रमाणीकरण न केल्यास योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.
आधार प्रमाणिकरण करताना आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्कम चुकली असेल, तर त्याबाबत शेतकऱ्यांनी तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवून तक्रारीबाबत आवश्यक ती कागदपत्रे आले बँक शाखेत तात्काळ जमा करावीत. आधार प्रमाणिकरण बाकी असलेल्या संबंधित शेतकऱ्यांनी सदर योजनेच्या लाभासाठी मुळ आधारकार्ड व बचत खात्योच पासबुक घेऊन संबंधित बँकेत, CSC व आपले सरकार सेवा (ASSK) केंद्रावर जाऊन तातडीने आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ.मुकेश बारहाते यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, वि.का.संस्था कार्यालये तसेच तालुका उपसहायक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा,असेही कळविण्यात आले आहे.
00000



