
नव्या मुंबईतून स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत ‘स्वच्छता रन’मध्ये धावले 1 हजारहून अधिक नवी मुंबईकर
नवी मुंबई प्रतिनिधी ‘निश्चय केला, नंबर पहिला’ अशा घोषणा देत 1 हजारहून अधिक नवी मुंबईकरांनी आज ‘स्वच्छता रन’ मध्ये सहभागी होत स्वच्छतेचा जागर केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यात ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियानांतर्गत आयोजित केलेल्या सर्वच उपक्रमांना नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. आजही नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या आयकॉनिक मुख्यालय इमारतीसमोर आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छता रन’ मध्ये रात्रभर व पहाटे मोठ्या प्रमाणात पाऊस असूनही स्वच्छता ध्येयाने भारलेले हजारहून अधिक नागरिक अतिशय उत्साहाने धावले.
याआधी 22 सप्टेंबर रोजी याच ठिकाणी सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्येही 500 हून अधिक सायकलपटू उत्साहाने सहभागी झाले होते. आजही स्वच्छता रनमध्ये पाऊस असूनही हजारहून अधिक स्वच्छता ध्येयाने भारलेले नागरिक नमुंमपा मुख्यालयापासून वजीराणी स्पोर्ट्स क्लबपर्यंत व तेथून परत मुख्यालयापर्यंत धावले.
धावणे हा सर्वोत्तम व्यायाम असून या स्वच्छता रनच्या माध्यमातून स्वच्छतेप्रमाणेच आरोग्य जपणुकीचा संदेशही प्रसारित करण्यात आला अशी भूमिका आयुक्तांनी मांडली. स्वच्छता ही प्रत्येक घरापासून सुरू झाली तर घर, परिसर, राज्य, देश स्वच्छ राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी आमदार श्री.गणेश नाईक, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे मिशन संचालक श्री. नवनाथ वाठ, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व श्री.शिरीष आरदवाड, माजी आमदार श्री.संदीप नाईक तसेच महानगरपालिकेचे विभागाप्रमुख आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छता रनच्या आयोजनात स्वच्छ नवी मुंबई मिशनच्या वुमेन आयकॉन श्रीम. रिचा समित यांची लेट्स सेलिब्रेट फिटनेस संस्था आणि द लर्नयार्ड या क्रीडा क्षेत्राशी संबंधित संस्थांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी स्वच्छता रन मध्ये सहभागी झालेले कन्याकुमारी ते काश्मिर धावण्याचा जागतिक विक्रम केलेले गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर श्री.संजय शर्मा यांना आयुक्तांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महापालिका अधिका-यांमधून 10 किमीची स्वच्छता रन पूर्ण करणारे प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
त्याचप्रमाणे 10 किमी अंतराची स्वच्छता रन सर्वात जलद पूर्ण करणारे प्रथम 3 क्रमांकाचे मानकरी सुरज गोरे, मनोज गावित आणि गुणवंत जाधव यांचा पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे सहभागी महिलांमधून सर्वाधिक कमी वेळेत अंतर पूर्ण करणा-या ज्योती ठाकूर, ममता ठाकूर व सुनिता छैनानी या महिला धावपटूंना सौ. रेवती कैलास शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले.
उद्या रविवार, दि. 29 सप्टेंबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यात ‘महामार्गांची महास्वच्छता मोहीम’ राबविली जात आहे. या अंतर्गत सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गाची स्वच्छता सकाळी 7 पासून करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या महामार्गांची स्वच्छता करताना रेवदंडा, अलिबाग येथील डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य मोठ्या संख्येने पद्मश्री, महाराष्ट्रभूषण डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या महामार्ग सखोल स्वच्छता महामोहीमेत सहभागी होणार आहेत.
तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वा. आयोजित करण्यात आलेल्या सायन पनवेल महामार्ग तसेच ठाणे बेलापूर मार्ग सखोल स्वच्छता मोहीमेत लोकप्रतिनिधी, स्वच्छताप्रेमी नागरिक, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, विविध प्रकारच्या संस्था व मंडळांचे सदस्य, एनएसएस व इतर विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.



