
जिल्ह्यात 14 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालत..
सांगली, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार, दि. 14 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून ती तडजोडीने मिटविण्याबाबत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी केले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालय सांगली, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, सहकार न्यायालय 1, 2 व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे (फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, बँकेची दिवाणी दावे, नियमित दिवाणी दावे, भूमि संपादन प्रकरणे, कौटुंबिक वादातील प्रकरणे, चलनक्षम दस्तऐवज (N.I. Act 138) प्रकरणे, कामगार न्यायालयातील प्रकरणे व दावापूर्व प्रकरणे (वीज बिल, टेलिफोन बिल, बँकेतील वसुली प्रकरणे) आदि प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवता येतील.
000000



