
🔴न्यूज फ्लॅश;
🟠 *दख्खनची राणी’चे ९२ व्या वर्षात मोठ्या दिमाखात पदार्पण*
*पुणे* – देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याला रेल्वे मार्गाने जोडणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या ‘डेक्कन क्वीन’ अर्थात ‘दख्खनच्या राणी’ला आज मंगळवार १ जून रोजी ९१ वर्षे पूर्ण झाली आहेत.
१ जून १९३० रोजी सुरू झालेला ‘डेक्कन क्वीन’चा प्रवास आजही अव्याहतपणे सुरू असून मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ती आजही पहिली पसंती आहे.तेव्हाच्या ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ने (जीआयपीआर) अर्थात आताच्या मध्य रेल्वेने ‘डेक्कन क्वीन’च्या रूपाने भारतातील पहिली डिलक्स रेल्वे सुरू केली. ही भारतातील पहिली अति जलद गाडी होती. सुरुवातीला या गाडीतून फक्त ब्रिटिश लोकच प्रवास करू शकत होते. गाडीतून प्रवास करण्याची भारतीयांना परवानगी नव्हती. पुढे १९४३ मध्ये या गाडीतून प्रवास करण्याची परवानगी भारतीयांना देण्यात आली. तेव्हापासून या गाडीकडे प्रवाशांचा जो ओघ सुरू झाला तो आजही कायम आहे.
विद्युत इंजिनावर चालणारी लांब पल्ल्याची पहिली गाडी, महिलांसाठी विशेष डबा जोडण्यात आलेली तसेच गाडीत स्वतंत्र ‘खान-पान डबा’ (डायनिंग कार) असलेली पहिली गाडी असे अनेक बहुमान ‘डेक्कन क्वीन’ला मिळाले आहेत. ही गाडी पहिल्यांदा सात डब्यांची होती, नंतर ही संख्या १२ झाली आणि सध्या ही गाडी १७ डब्यांची आहे. डेक्कन क्वीन गाडीने प्रवास करणारे प्रवासी आणि या गाडीचे एक भावनिक नाते निर्माण झाले आहे. ‘डेक्कन क्वीन’ म्हणजे नोकरी निमित्त दररोज एकत्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे एक कुटुंब झाले आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या दक्खनच्या राणीचा वाढदिवस जल्लोषात साजरा करता येत नसला तरी दक्खनच्या राणीच्या प्रती प्रवाशांचे भावनिक व कौटुंबिक नाते कायम असल्याचे ‘पुणे-मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे सचिव प्रकाश संकपाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.



