बारवाले महाविद्यालयात ‘Flagship Programme’ कार्यशाळा उत्साहात पार पडली
जालना, प्रतिनिधी : भारत सरकारकडून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या महत्वाकांक्षी योजनांना फ्लॅगशिप कार्यक्रम म्हटले जाते. या कार्यक्रमांचे उद्दिष्ट युवक व विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करणे, देशाला डिजिटल व कौशल्यसंपन्न बनवणे तसेच समाजातील सर्व घटकांचा समावेशक विकास साध्य करणे हे आहे.
याच उद्देशाने बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना येथे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत ‘Workshop on Flagship Programme’ चे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम मेरा युवा भारत,जालना, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय व युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने झाला. सदरील कार्यक्रम हे प्रणित सांगवीकर, जिल्हा युवा अधिकारी, माय भारत जालना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कविता प्रशार होत्या. यावेळी प्रणित सांगवीकर (जिल्हा युवा अधिकारी, माय भारत जालना), गोरख भवर व विजय खरात (सायबर पोलीस स्टेशन, जालना), कैलास काळे (संचालक, MSDC प्रा. लि.), तसेच एस. एम. काझी (संगणक विभाग प्रमुख) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रस्तावना एस. एम. काझी यांनी केली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शगुन परिदा यांनी केले. यावेळी एस. एम. काझी यांनी आपल्या प्रस्ताविकेत विद्यार्थ्यांना या कार्यशाळेचे महत्त्व पटवून सांगितले. यावेळी संगणक विभागातर्फे सायबर फ्रॉड आणि स्किल इंडिया विषयक पोस्टरचे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी गोरख भवर व विजय खरात यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी ऑनलाईन सायबर फसवणूक कशी होते, ती टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतात यावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना ओटीपी शेअरिंग, फेक लिंक, फिशिंग, सोशल मीडिया हॅकिंग यांसारख्या सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देत सावधगिरीचे उपाय सांगितले. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी विविध शंका उपस्थित केल्या व अधिक माहिती मिळवली.
यानंतर मातोश्री स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक कैलास काळे यांनी स्किल इंडिया योजनेबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांची, रोजगार संधींची व करिअरमध्ये होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली. काळे यांनी विशेषतः डिजिटल स्किल्स, उद्योजकता प्रशिक्षण, उद्योगसंबंधीत कौशल्यविकास यावर भर दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक विभागातील वैशाली शिंदे, रोशनी सुरा, गायत्री कोंबे, कांचन कायंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड, महाविद्यालयीन कर्मचारी सुंदर वायाळ, सुरेश खरात, शिवाजी जोशी, नरेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.