
मुंबईच्या गोळीबार नगर मधील रहिवाशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा,शिवालिक व्हेंचर्स या विकासकाने झोपडीधारकांची पुनर्वसन योजना गेली 14 वर्षांपासून रखडवली.
मुंबई : प्रतिनिधी,सांताक्रूझ पूर्वेकडील गोळीबार रोड ( येथील शिवालिक व्हेंचर्स या विकासकाने झोपडीधारकांची पुनर्वसन योजना गेली 14 वर्षांपासून रखडवली आहे. रहिवाशांना भाडे न देणे, संक्रमण शिबिराच्या दुरावस्थेकडे विकासकाचे दुर्लक्ष झाले असल्याने याविरोधात आता रहिवाशी आक्रमक झाले आहेत. सरकारकडूनही विकासकावर कारवाई होत नसल्याने अखेर रहिवाशांनी 21 ऑगस्ट रोजी आंबेवाडी बुद्धविहारासोर खार पूर्व येथे आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
खार पूर्वेकडील गोळीबार मार्गावरील पंचशील सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास शिवालिक डेव्हलपर्स या कंपनीने 14 वर्षांपूर्वी हाती घेतला होता. योजना राबविण्यासाठी येथील रहिवाशांच्या तात्पुरत्या वास्तव्यासाठी याच परिसरात संक्रमण शिबीर उभारले. या शिबिराची मुदत उलटून गेली तरी आहे त्याच घरांमध्ये नागरिकांना वास्तव्य करावे लागत आहे. संक्रमण शिबिराची डागडुजी होत नसल्याने धोकादायक स्थितीत रहिवाशांना रहावे लागत आहे. अशा विविध समस्यांबाबत रहिवाशी एसआरए अधिकाऱ्यांकडे तक्रार करत आहेत. तरीही विकासकावर कारवाई होत नसल्याने रहिवाशी हतबल झाले आहेत. पुनर्विकासाचे काम तातडीने सुरु करून, रहिवाशांना भाडे द्यावे, संक्रमण शिबिराची दुरुस्ती करावी अशा विविध मागण्या रहिवाशांनी गृहनिर्माण मंत्र्यांकडे केल्या होत्या. मात्र त्याची दखल घेण्यात येत नसल्याने अखेर रहिवाशांनी २१ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.



