गोव्याच्या अर्पोरा परिसरातील ‘बर्च बाय रोमियो लेन्स- 25 पैकी 23 गुदमरुन दगावले, आग लागल्यावर कर्मचारी का पळाले नाहीत? मृतांमध्ये दोघे महाराष्ट्राचे, यादी
राज्य प्रतिनिधी- गोव्याच्या अर्पोरा परिसरातील ‘बर्च बाय रोमियो लेन्स’ या पबमध्ये शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून मोठा अनर्थ घडला. या दुर्घटनेत 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात 5 पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे. यातील मृतांची ओळख पटली असून यामध्ये 20 जण पबमधील कर्मचारी आहेत. नेमकं घडलं काय? आग कशी लागली? मृतांची नावं काय आहेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
नेमकं मध्यरात्री घडलं काय?
क्लबचा पहिला मजला लाकडाचा वापर करून सजवण्यात आला होता. त्याच्या भिंती काचेच्या होत्या. आतील भागात डान्स फ्लोअरला साजेशी रोषणाई तयार करण्यात आली होती. स्टेजवर बॅलेनृत्य सुरू होते. ज्यावेळी क्लबला आग लागली, त्यावेळी शोलेतील प्रसिद्ध ‘महबूबा… महबूबा…’ या गाण्यावर नर्तिका बॅले नृत्य करीत होती. तिला इतर कलाकार साथ देत होते. नृत्य सुरू असताना हळूहळू आग पसरू लागली. अवघ्या दहा सेकंदात आगीने रौद्ररूप धारण केले. या कार्यक्रमादरम्यान छतातून धुराचे लोट येण्यास सुरुवात झाली. लगेच त्याचे रूपांतर आगीत झाले. सर्वत्र धावपळ सुरू झाली. पण क्षणार्धात आग क्लबमध्ये पसरली.
आग कशी लागली?
बर्च क्लबमध्ये नेहमीप्रमाणे शनिवारी गर्दी होती. बरेच पर्यटक क्लबच्या पहिल्या मजल्यावर सुरू असलेला बॅले डान्स पाहण्यात मग्न होते. याचवेळी आतषबाजी सुरू झाली व क्लबमधील लाकडाने पेट घेतला. आग लागल्याने सर्वांची पळापळ सुरू झाली. लोक पहिल्या मजल्यावरून खाली आले. खालच्या मजल्यावर कर्मचारी काम करत होते. क्लबमध्ये एकच ‘एक्झिट पॉइंट’ असल्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
25 पैकी 23 जणांचा गुदमरल्याने मृत्यू,पणजीपासून 25 किलोमीटर अंतरावरील हडफडे-बागा भागातील ‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’मध्ये शनिवारी भीषण आग लागून 25 जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत 25 पैकी 23 जणांचा गुदमरल्याने मृत्यू झाला. तर दोघे आगीत होरपळले. सहा जखमींना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. या आगीने काही क्षणांत रौद्ररुप धारण करून संपूर्ण परिसराला घेरले.
मृत कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील दोघे-अन्य 20 जण क्लबमधील कर्मचारी असून यात उत्तराखंड (5), नेपाळ (4), झारखंड (4), आसाम (4), महाराष्ट्र (2), उत्तर प्रदेश (1), प. बंगालचे (1) रहिवासी आहेत. या सर्वाची ओळख पटली आहे.
कोणला अटक झाली? कोण फरार?या प्रकरणी हणजूण पोलिसांनी कल्बचे मुख्य सरव्यवस्थापक राजीव मोडक (49), गेट मॅनेजर प्रियांशू ठाकूर (32), बार मॅनेजर राजवीर सिंघानिया (32) आणि सरव्यवस्थापक विवेक सिंग (27) यांना अटक केली आहे. तर मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा (रा. दिल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत चार पर्यटक दिल्लीतील एकाच कुटुंबातील असून एक पर्यटक कर्नाटकातील आहे.
सुरक्षा नियम धाब्यावर बसवून क्लबची रचना-तीन वर्षांपूर्वी हा क्लब सुरू झाला होता. ज्या जागेवर हा क्लब आहे त्या ठिकाणी मिठागरे होती. तरीही तिथे क्लब उभारण्यात आला. क्लबची उभारणी पाण्यात व काही अंशी लाकडाचा वापर केल्याने बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग केला होता. त्याला जोडून तळमजल्यावर किचन होते. आगीच्या धुराचे लोळ तळमजल्यात शिरले. त्यामुळे किचनमध्ये असणारे कामगार आतच अडकले व धुरामुळे अनेकजण गुदमरून दगावले. किचनलाही एक्झिट सुविधा नसल्याने अडचणीत जास्त भर पडली. आग लागली तेव्हा क्लबच्या डान्स फ्लोअरवर 100 जण नाचत होते. या क्लबमध्ये प्रचंड गर्दी होती.
25 मृतांची नावे
1) मोहित: झारखंड : स्टाफ
2) प्रदीप महतो: झारखंड : स्टाफ
3) बिनोद महतो: झारखंड : स्टाफ
4) राहुल तंटी: आसाम : स्टा
5) सतीश सिंग: उत्तराखंड : स्टाफ
6) मनजोत मल : आसाम : स्टाफ
7) चूर्ण बहादूर पुन: नेपाळ : स्टाफ
8) सुरेंद्र सिंग: उत्तराखंड : स्टाफ
9) सुभाष चेत्री: दार्जिलिंग पश्चिम बंगाल : स्टाफ
10) जितेंद्र सिंग: उत्तराखंड : स्टाफ
11) सुमित नेगी: उत्तराखंड : स्टाफ
12) मनीष सिंग: उत्तराखंड : स्टाफ
13) विवेक कटवाल : नेपाळ : स्टाफ
14) साबिन: नेपाळ : स्टाफ
15) सुनीलकुमार: उत्तर प्रदेश : स्टाफ
16) दिगंबर पाटीर : आसाम : स्टाफ
17) रोहन सिंग: उत्तर प्रदेश : स्टाफ
18) डॉमिनिक: महाराष्ट्र : स्टाफ
19) मनोज जोरा : महाराष्ट्र : स्टाफ
20) सुदीप: नेपाळ : स्टाफ
21) इशाक: कर्नाटक : पर्यटक
22) सरोज जोशी: दिल्ली : पर्यटक
23) विनोद कुमार: दिल्ली : पर्यटक 24) अनिता जोशी: दिल्ली : पर्यटक 25) कमला जोशी: दिल्ली : पर्यटकजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती राज्य सरकारने उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली असून एक आठवड्यात अहवाल मागवला आहे. प्रथमदर्शनी आतषबाजीमुळे ही आग लागल्याचा संशय आहे.