vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद,एकाच दिवसात हजारो महसुली प्रकरणांचा निपटारा

जिल्ह्यात ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद,एकाच दिवसात हजारो महसुली प्रकरणांचा निपटारा

​अहिल्यानगर, प्रतिनिधी : सर्वसामान्य जनतेच्या महसुली समस्यांचे एकाच छताखाली निराकरण करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात आज ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१’ यशस्वीरित्या पार पडले. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या विशेष शिबिराला नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील विविध महसूल मंडळांमध्ये या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. १४ मार्च रोजी राबविण्यात आलेल्या या अभियानाची आकडेवारी प्रशासनाच्या गतिमान कामकाजाची साक्ष देते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या एकाच दिवसात जिल्ह्यात तब्बल १,३७९ प्रलंबित फेरफार निकाली काढण्यात आले. शासनाच्या एक खिडकी व्यवस्थेचा प्रभावी वापर करत १,५८५ अर्ज तातडीने निकाली काढण्यात आले. तसेच, सातबारा उताऱ्यातील दुरुस्तीसंदर्भात ७२० अर्ज स्वीकारून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली.

नागरिकांना व विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांचे तत्काळ वाटप हे या शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. या अभियानांतर्गत एकाच दिवसात तब्बल ४,३२३ विविध प्रमाणपत्रांचे (उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाणपत्रे इ.) वितरण करण्यात आले. याशिवाय, पारदर्शकता आणि डिजिटलायझेशनला चालना देत ४,२१७ डिजिटल सातबारा उतारे आणि २,६३२ आठ-अ उताऱ्यांच्या प्रती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रशासकीय दप्तर अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत भूसंपादन प्रकरणी ५७, तर अकृषिक (बिनशेती) परवानगी दिलेल्या प्रकरणी १९ कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्यात आले.

​या समाधान शिबिरामध्ये केवळ प्रलंबित प्रकरणांचा निपटाराच नाही, तर शासनाच्या विविध योजनांबाबत प्रबोधनही करण्यात आले. महाभूमी पोर्टलवरील डिजिटल सातबाराच्या कायदेशीर वैधतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच ई-मोजणी, ई-फेरफार, ॲग्रीस्टॅक, पीएम किसान योजना आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील अकृषिक रूपांतरणाच्या नव्या सुलभ प्रक्रियेबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

​मार्च ते मे या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या या अभियानांतर्गत एप्रिल आणि मे महिन्यातही टप्प्याटप्प्याने मंडळ आणि नगरपरिषद स्तरावर अशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. महसूल विभागाच्या या थेट बांधावर आणि गावापर्यंत पोहोचण्याच्या उपक्रमामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित पोस्ट

मान्सूनपूर्व काळात घ्यावयाची खबरदारी

मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं

परभणीच्या पुरातत्व वारशाचे संवर्धन करून जागतिक स्तरावर नेणार– राज्यमंत्री तथा परभणी पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

कुंभमेळ्यासाठी मराठवाड्यातील भाविकांना विशेष रेल्वेची सुविधा*माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पाठपुराव्यास यश!*

vishwatmaklokswamivarta

वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ४२६ शिक्षकांना मंजूर…

कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्यात किमान ५ लाख उद्योजक निर्माण करण्याचे प्रयत्न- कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा…