
पायभूत सुविधा निर्मितीतून लातूर पोलीस दल आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• लातूर सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण• नवनियुक्त ४६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप• क्यूआर कोड आधारित पेट्रोलिंग यंत्रणेचा शुभारंभ
लातूर, प्रतिनिधी: पारंपारिक गुन्हेगारी आणि सायबर गुन्हेगारीमध्ये मोठा फरक आहे. आताचा सायबर गुन्हेगार कुठेतरी दूरवर बसून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करत आहे. अशा आव्हानात्मक काळात नागरिकांच्या सायबर सुरक्षिततेसाठी आणि सायबर गुन्ह्यांच्या उकलीसाठी लातूर सायबर पोलीस ठाण्याची नूतनीकृत अद्यायवत इमारत उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देवून पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला लातूर पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते झाले. नव्याने पोलीस दलात भरती झालेल्या ४६ पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली, तसेच जिल्हाभरात राबवण्यात येणाऱ्या ‘क्यूआर कोड आधारित पेट्रोलिंग’ यंत्रणेचाही शुभारंभ करण्यात आला.
विधान परिषद आमदार तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे, आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संजय बनसोडे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाला सुसज्ज घरे आणि आधुनिक सोयी-सुविधा देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. लातूर जिल्ह्यातही पोलिसांना नवीन घरे, पोलीस अधीक्षक कार्यालयाला सुसज्ज इमारत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले. लातूर जिल्हा पोलीस दलाने गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलिसांनी ड्रग्ज रॅकेट आणि बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सजग राहून गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा, असे ते म्हणाले.सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता सायबर ठाण्यांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. लातूरमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शहरात अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना आमदार विक्रम काळे यांनी केली.
जिल्ह्याच्या निर्मितीपासून लातूर पोलीस दल विविध क्षेत्रात अग्रेसर राहिले आहे. येथील लोकप्रतिनिधी सदैव पोलीस दलाच्या पाठीशी उभे राहतात, ही लातूरची राजकीय संस्कृती आहे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी लातूर पोलीस दलाने पुढाकार घ्यावा, असे आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले. खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी लातूर जिल्हा पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचे सांगितले.
सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत अद्ययावत इमारतीमुळे सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, असे आमदार संजय बनसोडे म्हणाले. तसेच लातूरचे पोलीस दल आव्हानात्मक परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी जपत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी प्रास्ताविक केले. ‘आपले लातूर सुरक्षित लातूर’ उपक्रमांतर्गत लोकसहभागातून जिल्ह्यात ५१० सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. पोलीस केवळ गुन्हे उघड करत नाहीत, तर ‘पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर’ या उपक्रमातून शेतीचे वादही सोडवत आहेत, असे त्यांनी सांगितले. लातूर पोलीस लातूरकरांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी सज्ज आणि सक्षम असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
लातूर पोलीस दलाच्या लोकशक्ती रिल्स स्पर्धेला सुरुवात,सायबर फसवणूक, व्यसनाधीनता आणि वाहतूक नियम यांबाबत जनजागृती करण्यासाठी लातूर पोलीस दलामार्फत लोकशक्ती रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माहितीपत्रकाचे अनावरण पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. रिल्स हे समाज परिवर्तनाचे साधन बनावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे, असे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या स्पर्धेविषयी माहिती देताना सांगितले.
लातूर शहरात क्युआर कोड आधारित पेट्रोलिंग यंत्रणा राबविण्यात येत आहे. आता हा उपक्रम जिल्ह्यातील 23 पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात येणार असून यासाठी 907 ठिकाणी क्युआर कोड बसविण्यात आले आहेत. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी क्यूआर कोड स्कॅन करून या उपक्रमाचा शुभारंभ केला.उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांनी ‘क्यूआर कोड पेट्रोलिंग’बद्दल माहिती दिली, तर सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक बबिता वाकडकर यांनी आजवर तक्रारदारांचे ७७ लाख रुपये परत मिळवून दिल्याबद्दल माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
****
Collector & District Magistrate, Latur



