vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी ; कंत्राटी वेतनाची पडताळणी महिनाभरात पूर्ण करा : रवी रामू कलोसे सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे मनपा प्रशासनाला निर्देश

दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी ; कंत्राटी वेतनाची पडताळणी महिनाभरात पूर्ण करा : रवी रामू कलोसे सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे मनपा प्रशासनाला निर्देश

 

  जालना, प्रतिनिधी : सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यापासून ते त्यांच्या वेतन, पदोन्नती आणि निवासाच्या प्रश्नांपर्यंत सर्वच बाबींमध्ये प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि कालमर्यादेत कार्यवाही करावी, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी रामू कलोसे यांनी जालना महानगरपालिका प्रशासनाला दिले.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, नवी दिल्लीच्या वतीने महाराष्ट्र दौऱ्यांतर्गत श्री. कलोसे यांनी जालना महानगरपालिकेला आज रोजी भेट देत जालना महानगरपालिकेतील भारतरत्न श्री. अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आढावा बैठकीत स्थायी व अस्थायी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या, सेवाविषयक स्थिती, आरोग्य सुविधा, वेतन, सुरक्षा व्यवस्था आणि विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी

जालना शहर महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, मनपा उपायुक्त नंदा गायकवाड, नगरसचिव केशव कानपुडे, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी धर्मा खिल्लारे, सिटू संघटनेचे पदाधिकारी मधुकर मोकळे, हरिश्चंद्र लोखंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटोदेकर, निवासी पोलीस उपअधीक्षक श्री. इंगोले, जालना शहर महानगरपालिकेचे कार्यालय अधिक्षक गणेश बत्तीन, स्वच्छता विभागाचे सुधीर डहाळे, कर विभागाचे प्रमुख राहुल देशमुख, नगर अभियंता सय्यद सउद, पाणीपुरवठा अभियंता तायडे, मालमत्ता विभागाचे राजेश चंदनशिवे संगणक विभागाचे आनंद मोहिदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी श्री. कलोसे म्हणाले की, सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा असून, सर्व कर्मचाऱ्यांची दर सहा महिन्यांनी नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी. महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या तपासणीमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीवर विशेष भर द्यावा, असे निर्देश कलोसे यांनी दिले. तसेच सेप्टिक टँक स्वच्छतेसाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यास सांगितले. तसेच कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना लागू किमान वेतनाच्या तरतुदींनुसार वेतन मिळणे आवश्यक आहे. हे वेतन थेट संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे. वेतन वितरणात कोणतीही अनियमितता होत नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करावी आणि समितीचा अहवाल एका महिन्यात सादर करावा, असे निर्देश श्री. कलोसे यांनी यावेळी दिले.

नमस्ते’ (NAMASTE) योजनेची माहिती पात्र सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी येत्या सात दिवसांत व्यापक प्रचार व जनजागृती करावी. कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे आणि आरोग्यपत्रिका तयार करून जास्तीत जास्त पात्र कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा. सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत निवासस्थाने उपलब्ध करून देण्याबाबत महानगरपालिकेच्या महासभेचा ठराव घ्यावा आणि त्यानंतर आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. लाड व पागे समितीच्या शिफारशींनुसार प्राप्त झालेली प्रलंबित प्रकरणे आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून नियमानुसार तातडीने निकाली काढावीत. कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार लागू सेवा नियमांच्या अधीन राहून पदोन्नतीची कार्यवाही करावी. सर्व सफाई कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्ययावत करावीत. पात्र कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती तसेच १०, २० आणि ३० वर्षांच्या सेवेनंतरचे अनुज्ञेय लाभ तातडीने देण्याची कार्यवाही करावी. शासकीय सुट्ट्यांचा लाभ द्यावा किंवा सुट्टीच्या दिवशी काम केल्यास नियमानुसार मोबदला द्यावा असेही श्री. कलोसे म्हणाले.

शहरातील सामुदायिक शौचालयांच्या स्थितीचाही आढावा घेत, सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका स्तरावर समिती स्थापन करून त्यामध्ये कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना स्थान द्यावे. मंगल कार्यालये आणि हॉटेलमध्ये स्वच्छतेची कामे करणाऱ्या व्यक्तींच्या अनुषंगाने Manual Scavengers Act नुसार आवश्यक सर्वेक्षण करून घोषणापत्रे घ्यावीत. प्राप्त अर्ज व घोषणापत्रांची आयुक्तांनी पडताळणी करून संबंधित प्रकरणांचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीमार्फत शासनाकडे पाठवावेत. मागील १० ते १५ वर्षांपासून सातत्याने महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता आणि सेवेसंबंधी कागदपत्रे तपासून त्यांच्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत. सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षितता, आर्थिक हित आणि सेवाविषयक हक्क यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाने पार पाडावी, असे निर्देश यावेळी श्री. कलोसे यांनी दिले.

बैठकीच्या प्रारंभी महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी आणि सफाई कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचा परिचय करून सादरीकरणाद्वारे माहिती सादर केली. यावेळी मनपातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

****

संबंधित पोस्ट

जर जरी बक्ष उरूस यात्रोत्सव भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या– जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

⛈️ रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा

श्री गुरुगोबिंद सिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिलांसाठी प्रवेशाची सुवर्णसंधी

जिल्हा पोलिस दलाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण*47 आपत्ती प्रतिसाद किटचे वाटप

एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

धीरज परदेशी हत्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी