vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जुन्या बँक खात्यात विसरलेले, अडकलेले पैसे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने व्याजासह परत मिळण्याची सुवर्णसंधी

जुन्या बँक खात्यात विसरलेले, अडकलेले पैसे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने व्याजासह परत मिळण्याची सुवर्णसंधी

 

नवी मुंबई, प्रतिनिधी- अनेकदा नोकरीतील बदल, शहरांचे स्थलांतर किंवा अन्य कारणांमुळे नागरिक आपली जुनी बँक खाती वापरणे बंद करतात. कालांतराने या खात्यांकडे दुर्लक्ष होते आणि त्यातील जमा रकमेचा विसर पडतो. परंतु, आता अशा विसरलेल्या किंवा हक्काच्या पैशांची चिंता करण्याची गरज नाही, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नागरिकांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पुढे आली आहे. अनेक वर्षांपासून बँकांमध्ये पडून असलेल्या अशा ‘दावा न केलेल्या ठेवी’ (Unclaimed Deposits) शोधणे आणि त्या मूळ मालकांपर्यंत पोहोचवणे आता अत्यंत सोपे झाले आहे.

बँकिंग नियमांनुसार, जर एखादे बँक खाते सलग २ वर्षांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय राहिले तर ते ‘इनऑपरेटिव्ह’ मानले जाते. अशा खात्यांमधील रक्कम किंवा १० वर्षांपेक्षा अधिक काळ कोणताही व्यवहार न झालेल्या ठेवी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ‘ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी’ (DEA Fund – डीईए फंड) मध्ये सुरक्षितपणे हस्तांतरित केल्या जातात. मात्र, हा निधी आरबीआयकडे जमा झाला तरीही खातेदार किंवा त्यांचा कायदेशीर वारसदार या रकमेवर कधीही आपला हक्क सांगू शकतो आणि ती परत मिळवू शकतो.

नागरिकांना त्यांच्या अशा दाव्याविना पडून असलेल्या रकमांचा शोध सहज घेता यावा यासाठी रिझर्व्ह बँकेने ‘उदगम’ (UDGAM – Unclaimed Deposits Gateway to Access Information) हे विशेष वेब पोर्टल सुरू केले आहे. नागरिक https://udgam.rbi.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन किंवा संबंधित बँकेच्या वेबसाईटवर जाऊन आपल्या जुन्या ठेवींची माहिती मिळवू शकतात. सध्या या पोर्टलवर तब्बल ३० बँकांमधील अशा रकमांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आपले विसरलेले पैसे परत मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अत्यंत सोपी तीन टप्प्यांची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. पहिल्या टप्प्यात खातेदाराला किंवा त्याच्या वारसदाराला संबंधित बँकेच्या कोणत्याही शाखेत भेट द्यावी लागेल; ती त्यांची मूळ किंवा नियमित शाखा नसली तरीही चालू शकते. दुसऱ्या टप्प्यात, ग्राहकाला आपले केवायसी (KYC) म्हणजेच ओळख पटवणारी कागदपत्रे बँकेत सादर करावी लागतील. यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांपैकी आवश्यक ती कागदपत्रे आणि योग्य फॉर्म भरून द्यावा लागेल. अंतिम टप्प्यात, बँकेद्वारे कागदपत्रांची आणि खात्याची रीतसर पडताळणी केली जाईल. ही पडताळणी यशस्वी झाल्यानंतर, खात्यात असलेली सर्व रक्कम (लागू असल्यास व्याजासह) खातेदाराला सुरक्षितपणे परत केली जाते.

या मोहिमेला अधिक व्यापक करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ‘जाणकार बना, सतर्क राहा!’ असा संदेश दिला आहे. अधिक माहितीसाठी नागरिक https://rbikehtahai.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा ९९९९० ४१९३५ (99990 41935) या रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करू शकतात, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामावून घेतलेल्या वस्तीशाळा शिक्षकांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी केली आरोग्य तपासणी आणि साहित्य नोंदणी; लवकरच होणार साहित्य वाटप शिबीर

कोळसा वाहतुकीमुळे पिकांची होणारी नुकसानभरपाई ठरवण्यासाठी समिती गठीत-मंत्री शंभूराज देसाई

मुठा नदीवरील धोकादायक पूल कायमस्वरूपी बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश

बेळगावी येथे 19 ऑक्टोबरला माजी सैनिक मेळावा

vishwatmaklokswamivarta

महा-देवा फुटबॉल उपक्रम’अंतर्गत निवडक ६० विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार – क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta