
सहकार संकुलनाचे पालक मंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन
लातूर, प्रतिनिधी : येथील महात्मा फुले भाजी मार्केटच्या मागे सहकार संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. या इमारतीचे भूमिपूजन शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होईल. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
लातूर जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व दर्जेदार शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सहकार विभागाच्या अधिपत्याखालील लातूर शहरातील ११ क्षेत्रीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी हे सहकार संकुल उभारले जात आहे. या नवीन इमारतीमुळे शासकीय कामकाज अधिक कार्यक्षम होईल. तसेच नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध होतील. त्यामध्ये आधुनिक कार्यालयीन सुविधा, स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी कक्ष, बैठक व्यवस्था, अभिलेख कक्ष, संगणकीकृत कामकाजासाठी आवश्यक सुविधा, नागरिकांसाठी प्रशस्त प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ प्रवेश व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सहकार संकुल इमारत भूमिपूजन कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन लातूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक व्ही. एल. पोतंगले यांनी केले आहे.
सहकार विभागाची ११ कार्यालये एकाच छताखाली येणार
विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सहायक निबंधक सहाकारी संस्था, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 (साखर), सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 (बँक) सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-2(पणन) सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-2 (पदूम) सहकारी संस्था, लेखा परीक्षक श्रेणी -2 सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, जिल्हा कार्यालय लातूर अशी एकूण ११ कार्यालये सहकार संकुलात एकाच छताखाली येणार आहेत.
****



