vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टल’चे उद्घाटन महिला शेतकऱ्यांना आता मिळणार अधिकृत ओळख; प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टल’चे उद्घाटन महिला शेतकऱ्यांना आता मिळणार अधिकृत ओळख; प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू

मुंबई, प्रतिनिधी : ‘महिला शेतकरी पोर्टल’चे उद्घाटन भरणेवाडी येथून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना शासकीय योजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा, विस्तार सेवा तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत महिला शेतकऱ्यांना मान्यता देणे, त्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देणे आणि अधिकृत डेटाबेस तयार करणे यासाठी हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. यावेळी कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, आयुक्त सूरज मांढरे,संचालक उदय देशमुख उपस्थित होते.

राज्यातील महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महिला शेतकऱ्यांसाठी प्रमाणपत्र मिळविण्याची ऑनलाइन सुविधा कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी https://krishi.maharashtra.gov.in⁠ या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.जमिनीची मालकी नव्हे, शेतीतील प्रत्यक्ष सहभाग महत्वाचा,या अधिनियमामुळे महिला शेतकरी म्हणून मान्यता देताना केवळ जमिनीच्या मालकीचा निकष ग्राह्य धरला जाणार नाही. महिलेचा शेती व शेतीशी संबंधित कामांमधील प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा मानण्यात आला आहे. अधिनियमामध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायांची व्यापक व्याख्या करण्यात आली असून, यामध्ये शेती, बागायती, भाजीपाला, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मधमाशीपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम उत्पादन, फळबाग, एरंडी उत्पादन, अंबाडी लागवड, कृषी-वनीकरण, कंपोस्ट निर्मिती यांसह विविध कृषी व शेतीपूरक कामांचा समावेश आहे.

याशिवाय भाडेपट्ट्याने किंवा बटाईने शेती करणाऱ्या महिला, भूमिहीन शेतकरी, भूमिहीन पशुपालक, शेतमजूर, रोपमळा मजूर व पशुधारक यांचाही महिला शेतकरी म्हणून समावेश करण्यात आला आहे. राज्यातील ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आणि शेती व्यवसायात कार्यरत असलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी पात्र ठरतील.

ऑनलाइन अर्जानंतर ग्रामसभा अथवा नगरपंचायतीकडून मान्यता,महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित अर्ज नियमानुसार ग्रामसभा किंवा नगरपंचायतीच्या विशेष सभेसमोर ठेवण्यात येईल. अर्जदार महिलेने अधिनियमात नमूद केलेल्या शेती अथवा शेतीसंबंधित कामांमध्ये सहभाग असल्याबाबत सभेमध्ये विचार करण्यात येईल.

अर्ज मान्य किंवा नामंजूर करण्याचा निर्णय घेताना त्याची कारणे लेखी स्वरूपात नोंदविण्यात येतील. ग्रामसभेने महिला शेतकरी म्हणून मान्यता दिल्यानंतर संबंधित पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून १५ दिवसांच्या आत महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नगरपंचायत क्षेत्रातील अर्ज संबंधित सर्वसाधारण सभेसमोर मांडून त्यावर निर्णय घेण्यात येईल. मान्यता मिळाल्यानंतर पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडून १५ दिवसांच्या आत प्रमाणपत्र देण्यात येईल.

संबंधित पोस्ट

वांशिक नरसंहार स्मृती दिनानिमित्त राज्यपालांची मृतात्म्यांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठांच्या मदतीसाठी १४५६७ हेल्पलाईन

सहकार संकुलनाचे पालक मंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन  

राज्यात बॉम्बस्फोट करण्याची धमकीचा संदेश; मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाला धमकीचा ईमेल भारत-पाकिस्तान तणाव परिस्थीतीदरम्यान मुंबई हाय अलर्ट..

महाराष्ट्र राज्य सर्व राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर   जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  निदर्शने 

क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन