vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

तत्वनिष्ठ, व्यासंगी इतिहास संशोधक हरपला,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली

तत्वनिष्ठ, व्यासंगी इतिहास संशोधक हरपला,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली

 

मुंबई, प्रतिनिधी: ज्यांच्या व्यासंग आणि संशोधनपूर्ण मांडणीमुळे नव्या पिढीसाठी शिव-शाहू चरित्रांचा अमुल्य असा ठेवा उपलब्ध झाला. अशा डॉ जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे आपण इतिहास संशोधन क्षेत्रातील तत्वनिष्ठ, व्यासंगी मार्गदर्शकाला मुकलो आहोत, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. पवार यांनी इतिहास संशोधन आणि अभ्यासाला वाहून घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्रांचा अनेक अंगांनी वेध घेणारी मांडणी त्यांनी केली. विशेषतः शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी इतिहास लेखन, संशोधन- प्रकल्पांना चालना दिली. त्यामुळेच शिवचरित्रासह, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब ते महाराणी ताराराणी आणि राजर्षी छत्रपती शाहू यांच्याविषयी विपुल संदर्भ साहित्याची निर्मिती झाली. डॉ. पवार यांच्या पुढाकारामुळे राजर्षी शाहू छत्रपती यांचे कार्य इंग्रजीसह, अन्य विदेशी तसेच भारतीय भाषांमध्ये पोहोचले. यातून निर्माण झालेली ग्रंथसंपदा ही महाराष्ट्रासाठी संचित ठरणारे आहे. डॉ पवार यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्रातील व्यासंगी मार्गदर्शक हरपला आहे. ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनाने पवार तसेच त्यांच्या संशोधक विद्यार्थी परिवारावर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,

ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे शिवचरित्राचा आणि मराठा इतिहासाचा वस्तुनिष्ठ मागोवा घेणारा एक व्यासंगी संशोधक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे

डॉ. जयसिंगराव पवार यांनी आयुष्यभर महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर मांडण्याचे काम केले. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर त्यांनी केलेले संशोधन मार्गदर्शक ठरले आहे. त्यांच्या निधनामुळे ऐतिहासिक संशोधन क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहे

डॉ. जयसिंगराव पवार यांनी केवळ इतिहास लिहिला नाही, तर तो पुराव्यांच्या आधारे जनमानसात रुजवला. कोल्हापूरच्या मातीत राहून त्यांनी शिवकाल आणि शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जागतिक पातळीवर नेला. त्यांच्या लेखणीत एक वेगळीच धार आणि सत्याचा आग्रह होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत योगदान देणारा एक दीपस्तंभ गमावल्याचे आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली

मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई, प्रतिनिधी  ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी आहे. मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, छत्रपती राजाराम महाराज, संताजी-धनाजी, राजर्षी शाहू महाराज, रामचंद्र पंत अमात्य ते क्रांतिसिंह नाना पाटील यांसारख्या इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास करून डॉ. जयसिंगराव पवार यांनी वस्तुनिष्ठ आणि दस्तऐवजांवर आधारित इतिहास लेखन केले. मराठेशाहीतील इतिहासावरील गैरसमज दूर करून वास्तववादी इतिहास समाजासमोर मांडण्याचे त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे.

त्यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्रातील एक प्रामाणिक, अभ्यासू आणि तपस्वी व्यक्तिमत्त्व आपण गमावले असून, त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सदैव मार्गदर्शक राहील, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

 

संबंधित पोस्ट

राज्य सीईटी सेलच्या ‘सीईटी-अटल’ विशेष उपक्रमात 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी‘अटल’ ऑनलाइन नोंदणी प्रणालीमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे -उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पल्स 2027’ साठी स्वतंत्र कंपनी व दुहेरी समित्यांची स्थापन शासन निर्णय लवकरच     – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

इराणने मर्यादा ओलांडल्यास पुन्हा हवाई हल्ले; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा 

शासन आणि लोकप्रतिनिधी मिळून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित महा जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद महानगरपालिका , स्वयंसेवक आणि गांधीनगर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचे केले अभिनंदन; ‘मियावाकी’ पद्धतीने अवघ्या एका तासात 3.61 लाखांहून अधिक रोपट्यांची लागवड करत रचला ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’