
अनुसूचित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तहसीलस्तरावरच मिळणार MPSC-UPSC चे मार्गदर्शन ‘महाज्योती’ आणि ‘अमृत’च्या संयुक्त पुढाकाराने बुलढाण्यात विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन
बुलढाणा, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण तसेच महाज्योती (नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (EWS) विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे (MPSC/UPSC) मोफत मार्गदर्शन केंद्र तहसीलस्तरावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत करिअर घडवण्याची संधी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमादरम्यान ‘अमृत’ (AMRUT) संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शासकीय कामकाजाची ओळख व विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पाटील आणि तहसीलदार सोनाली माजीमाके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे नियोजन, अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि वेळेचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. तसेच तहसीलदार सुनील पाटील आणि नायब तहसीलदार सोनाली माजीमाके यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की, “केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष प्रशासकीय कार्यपद्धती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि लोकसेवेची भावना बाळगल्यास MPSC व UPSC परीक्षांमध्ये निश्चित यश मिळवता येते.”
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा शहराकडे होणारा नाहक प्रवास टळणार असून तहसीलस्तरावरच दर्जेदार मार्गदर्शन मिळणार आहे. शासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी व्हावा, विद्यार्थ्यांना शासकीय यंत्रणेची प्रत्यक्ष ओळख व्हावी, यासाठी ‘अमृत’ संस्थेने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या प्रसंगी ‘अमृत’चे जिल्हा व्यवस्थापक जिग्रेश कंपनी, जे. व्ही. मेहता महाविद्यालयाचे प्राचार्य मेश्राम, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. योजना व मार्गदर्शनाबाबत अधिक माहिती हवी असल्यास पात्र विद्यार्थ्यांनी ‘अमृत’ जिल्हा कार्यालय, फ्लॅट नंबर ३०५, तिसरा मजला, प्राइड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा – ४४३००१.पत्यावर संपर्क साधावा.
00000



