कर्णपूरा यात्रोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे– जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – कर्णपूरा यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा व वाहतूक आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या. तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून नियोजन करून यात्रा शांततेत व सुरळीत पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, प्रभारी सहायक पोलीस आयुक्त मजहर ए. सय्यद, महानगरपालिका उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) नंदकिशोर भोंबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, वाहतूक शाखेचे दीपक शिंदे तसेच अन्न व औषध प्रशासन, महावितरण, अग्निशमन विभाग, महानगरपालिकेच्या संबंधित विभागांचे आणि छावणी परिसराचे अधिकारी उपस्थित होते.
कर्णपूरा यात्रोत्सवासाठी सुमारे ८ ते १० लाख भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन गर्दीचे व्यवस्थापन, पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजन व वाहनतळाची व्यवस्था काटेकोरपणे करावी. आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक स्पष्टपणे लावावेत. आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन पथके आवश्यक साधनसामग्रीसह सज्ज ठेवावीत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
महानगरपालिकेने यात्रा परिसराची नियमित स्वच्छता, घंटागाड्यांची व्यवस्था व अन्य आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आरोग्य विभागाने वैद्यकीय पथके, औषधसाठा व आपत्कालीन आरोग्य सेवा सज्ज ठेवाव्यात. भाविकांसाठी आवश्यक पाणीपुरवठ्याचे नियोजन करून गरजेनुसार टँकर उपलब्ध करावेत. अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न परवाना घेण्याबाबत मार्गदर्शन करावे तसेच खाद्यपदार्थांची गुणवत्ता व स्वच्छतेबाबत आवश्यक तपासणी करावी.
महावितरणने सुरक्षित व अखंडित वीजपुरवठ्याचे नियोजन करावे. परिवहन विभाग व एसटी महामंडळाने भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी. पोलीस, महसूल, महानगरपालिका, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, महावितरण, परिवहन यासह सर्व संबंधित विभागांनी आपापली जबाबदारी निश्चित करून समन्वयाने कार्यवाही करावी.
जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा. यात्रेदरम्यान कोणतीही दुर्घटना अथवा अनुचित घटना घडणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे. भाविकांची सुरक्षितता आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन कर्णपूरा यात्रोत्सव शांततेत, सुरक्षित व सुरळीत पार पाडावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गौडा जी. सी यांनी दिल्या.