‘अमृत शिवदुर्ग भूषण पुरस्कार २०२६’ साठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नामनिर्देशनाची संधी
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडदुर्गांचा अभ्यास, इतिहास संशोधन, जतन आणि संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी ‘अमृत शिवदुर्ग भूषण पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती आणि संस्थांची नामनिर्देशने ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन नोंदविता येणार आहेत. यासाठी www.amrutdurgotsav.com हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील गडदुर्गांचा ऐतिहासिक वारसा जतन करणे, त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संशोधन व संवर्धन करणे आणि दुर्गसंस्कृतीचा प्रसार करणाऱ्या समर्पित व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन देणे, हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या ऐतिहासिक किल्ल्यांसह महाराष्ट्रातील गडदुर्गांच्या अभ्यासासाठी योगदान देणाऱ्यांचा या उपक्रमातून गौरव करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे व्यक्तिगत आणि संस्थात्मक असे दोन विभाग आहेत. व्यक्तिगत विभागात निवड झालेल्या व्यक्तीला ५१ हजार रुपये रोख, विशेष सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. संस्थात्मक विभागात निवड झालेल्या संस्थेलाही ५१ हजार रुपये रोख रक्कम, विशेष सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी योग्य व पात्र व्यक्ती आणि संस्थांची निवड पारदर्शक व शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी तज्ज्ञ अभ्यासक आणि अनुभवी संशोधकांचा समावेश असलेली ‘अमृत शिवदुर्ग भूषण पुरस्कार समिती’ स्थापन करण्यात आली आहे. प्राप्त नामनिर्देशने आणि शिफारशींचे सखोल परीक्षण करून ही समिती अंतिम विजेत्यांची निवड करणार आहे.
यापूर्वीच्या पुरस्कारात व्यक्तिगत विभागातून नामवंत दुर्ग अभ्यासक प्रा. के. घाणेकर यांना, तर संस्थात्मक विभागातून दुर्गसंवर्धनासाठी कार्यरत असलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान या नोंदणीकृत संस्थेला ‘अमृत शिवदुर्ग भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता.
गडदुर्गांचा इतिहास हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा महत्त्वाचा भाग आहे. या ऐतिहासिक वारशाची माहिती जनसामान्यांपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचावी, नागरिकांमध्ये दुर्गभ्रमंती आणि इतिहास अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, तसेच दुर्गसंवर्धनासाठी प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या दुर्गसेवकांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पुरस्कारासाठी ऑनलाइन नामनिर्देशन प्रक्रिया १६ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली असून, ३१ ऑक्टोबर २०२६ ही अर्ज नोंदविण्याची अंतिम तारीख आहे. प्राप्त अर्जांची छाननी २ ते ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पुरस्कार समितीमार्फत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या दुर्गसंस्कृतीचा वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या योग्य व्यक्ती आणि संस्थांची नामनिर्देशने नागरिकांनी व शिवदुर्गप्रेमींनी करावीत आणि या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत, रायगड जिल्हा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, भूसंपादन उपजिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी, हिराकोट तलावासमोर, अलिबाग, जि. रायगड – ४०२२०१.संपर्क क्रमांक : ९११२२२८७५९ / ९४२३८९२१८२ / ८१४९५५२१४३.