लखनऊ फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोल्हापूरच्या ‘अनघा’ला पुरस्कार; जम्मूनंतर आणखी एक आंतरराष्ट्रीय यश..
बॉलीवूड प्रतिनिधी-कोल्हापूरच्या विजयलक्ष्मी फिल्म्स निर्मित आणि स्वप्नील बलवंत पाटील दिग्दर्शित ‘अनघा’ या मराठी लघुपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आणखी एक यश संपादन केले आहे. लखनऊ फिल्म फेस्टिव्हल आयोजित आणि उत्तर प्रदेश पर्यटन विभाग प्रस्तुत या महोत्सवात ‘अनघा’ या लघुपटातील प्रमुख भूमिकेत उत्कृष्ट अभिनय साकारल्याबद्दल अनुराधा सुमित साळुंखे यांना लखनऊ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट ॲक्ट्रेस’ पुरस्काराने गौरविण्यात आले. २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी लखनऊ, उत्तर प्रदेश येथे झालेल्या महोत्सवात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. जम्मू फिल्म फेस्टिव्हलमधील यशानंतर ‘अनघा’ला मिळालेला हा आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.या चित्रपट महोत्सवात ४८ देशांतील चित्रपटांनी सहभाग नोंदवला होता.
या महोत्सवाच्या ज्युरी पॅनेलमध्ये प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा, चित्रपट व अॅनिमेशन क्षेत्रातील वैभव कुमारेष, तसेच राजेश भाटिया, ज्योती कपूर दास, तहजीब खुराना आणि मनु बिष्ट यांचा समावेश होता. या मान्यवर ज्युरी सदस्यांनी महोत्सवातील सहभागी चित्रपटांचे परीक्षण केले.
अनघा’ या लघुपटाचे निर्माते साईकिरण काटुरी आणि स्नेहल जोतिबा कांबळे आहेत. लघुपटाच्या कथेची संकल्पना स्नेहल जोतिबा कांबळे यांची असून, दिग्दर्शन, कथा व पटकथा स्वप्नील बलवंत पाटील यांनी केली आहे. संवादलेखन विकास पांडुरंग पाटील आणि ऋतुजा दीपक चिपडे यांनी केले आहे.
भारतातील स्त्री हक्कांसाठी आणि घटस्फोटाच्या अधिकारासाठी संघर्ष करणाऱ्या डॉ. रखमाबाई राऊत यांच्या जीवनप्रवासापासून प्रेरणा घेऊन या लघुपटाची कथा साकारण्यात आली आहे. अनघा आणि किरण या दोन विवाहित स्त्रियांच्या आयुष्यातील घटना, त्यांचा संघर्ष आणि स्वातंत्र्याचा शोध यांचे संवेदनशील चित्रण या लघुपटातून करण्यात आले आहे.
लघुपटामध्ये अनुराधा सुमित साळुंखे, विजयलक्ष्मी रूपा कुंभार, धनंजय पाटील आणि रमा भालचंद्र यांच्या भूमिका आहेत. तांत्रिक टीममध्ये छायांकन स्वप्नील सुनीता, संकलन चंद्रशेखर बापू गुरव, संगीत व ध्वनिरचना ओंकार सुतार, सिंक साउंड विजय चौहान, कला दिग्दर्शन महेश रासळ, रंगभूषा सौरभ संकपाळ, वेशभूषा व कास्टिंग शाहिस्ता मकानदार, डीआय कलरिस्ट निलेश पोटे आणि अविनाश चौहान, कॅलिग्राफी व प्रसिद्धी रचना मणिपद्म हर्षवर्धन, प्रॉडक्शन मॅनेजर नीलाश्व स्टुडिओ टीम आणि सहाय्यक दिग्दर्शक अभिनव अजय कुरणे यांचा समावेश आहे.
जम्मू फिल्म फेस्टिव्हलमधील यशानंतर लखनऊ फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालेल्या या पुरस्कारामुळे विजयलक्ष्मी फिल्म्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे