vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मोरया सांस्कृतिक मंडळ, कोपरखैरणे नवी मुंबई महापौर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे मानकरी..

मोरया सांस्कृतिक मंडळ, कोपरखैरणे नवी मुंबई महापौर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे मानकरी..

 

    नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबईतील गावागावात संस्कृतीचा वारसा आधीपासूनच जपला जात होता, शहर वसल्यानंतर त्यामध्ये अधिक एकात्मभाव आला असे सांगत समाजाच्या एकोप्यासाठी असे उत्सव गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी शुध्द भाव जपणा-या व पर्यावरणपूरक जागरूकता असलेल्या गणेशोत्सव मंडळांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करण्याचा महानगरपालिकेचा हेतू कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

            नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित नवी मुंबई महापौर चषक सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी वनमंत्री श्री.गणेश नाईक आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी महापौर श्रीम.सुजाता पाटील, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम.मंदाताई म्हात्रे, क्रीडा सांस्कृतिक व युवक कल्याण समिती सभापती श्री.गिरीश म्हात्रे व श्री.राजू मढवी, फ प्रभाग समिती सभापती श्रीम.ललिता मढवी, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, पाणीपुरवठा समिती सभापती श्री.रविकांत पाटील, नगरसेवक श्रीम.अंजनी भोईर, श्री.शशिकांत राऊत, श्रीम.अंजली वाळुंज, श्री.विशाल विचारे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम विभाग उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

          सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती पाहता सुजाण नवी मुंबईकर जनता पाण्याचा जबाबदारीने काळजीपूर्वक वापर करील असा विश्वास व्यक्त करतानाच ना.श्री.गणेश नाईक यांनी पाण्याची गळती शोधून रोखणे, टीटीपीच्या पाण्याचा बांधकामे, गाडया धुणे, उद्याने यासाठी वापर करावा असे निर्देशित केले.

          महापौर श्री.सुजाता पाटील यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ‘मूर्ती लहान पण भावना महान’ ही पर्यावरणपूरक संकल्पना जपणा-या गणशोत्सव मंडळांचे विशेष कौतुक केले. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या परस्पर समन्वयातून पाणीपुरवठ्याचे केलेले नियोजन यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत महापौरांनी दिवाळीपूर्वी महिलांकडून उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दि.1 ते 4 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या हिरकणी महोत्सवाला मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले.

           बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम.मंदाताई म्हात्रे यांनी गणेशोत्सवातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोक एकत्र येतात व महापालिका अशा मंडळांच्या गौरव करते याबद्दल प्रशंसा केली. पाण्याची सर्वत्र टंचाई जाणवत असताना नवी मुंबईतील पाण्याचे सुयोग्य नियोजन करावे अशी सूचना त्यांनी केली. आज बचत केली तर उद्या पाणी कमी पडणार नाही याचे भान राखून नागरिकांनी पाण्याचा जपून काळजीपूर्वक वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.

           प्रास्ताविकपर मनोगतात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती श्री.गिरीश म्हात्रे यांनी यावर्षी पहिल्यांदाच सार्वजनिक गणशोत्सवाच्या स्पर्धेसोबत घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केल्याचे सांगितले. सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत 269 व घरगुती स्पर्धेत 109 कुटुंबानी सहभाग घेऊन या स्पर्धा यशस्वी केल्याचे सांगताना त्यांनी विजेत्यांसमवेत सहभागी होणा-या सर्वच मंडळांचे व कुटुंबांचे अभिनंदन केले.

          नमुंमपा क्षेत्रातील सहभागी 269 गणेशोत्सव मंडळातून उपान्त्य फेरीसाठी 38 मंडळांची निवड करण्यात आली व त्यामधून श्रीम.ज्योती नाडकर्णी, श्रीम.अक्षया चितळे, श्री.कोविन डायरस, डॉ. सुनिता पाल, डॉ.किरण देशमुख, श्री.मनोज जालनावाला या अंतिम परीक्षक मंडळांने 13 मंडळांची अंतिम पारितोषिकांसाठी निवड केली.

           त्यामध्ये सेक्टर 17 कोपरखैरणे येथील मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने नवी मुंबई महापौर चषक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रथम पारितोषिकाचा रू.70 हजार, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह बहुमान मंत्रीमहोदयांच्या हस्ते स्विकारला. अरूणोदय गणेशोत्सव मंडळ सेक्टर 10 नेरूळ व्दितीय क्रमांकाचे तसेच नवसाला पावणारा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर 17 वाशी हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.

           5 दिवसांच्या घरगुती गणेशोत्सवामध्ये रबाळेतील श्री.भावेश पारिया, गोठीवलीतील श्री.भानुदास मढवी आणि सानपाडा येथील श्री.निलेश हंचाटे प्रथम तीन क्रमांकाचे विजेते ठरले. 10 दिवसांच्या घरगुती गणेशोत्सवामध्ये वाशीतील श्री.एकनाथ भोईर, ऐरोलीतील स्वरूप मोरे व नेरूळ मधील श्री.मयूर गोळेकर यांनी अनुक्रमे तीन क्रमांकाची पारितोषिके पटकाविली.

           उत्कृष्ट पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेश मंडळाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक गणराज वाशीचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर 16 वाशी, व्दितीय पारितोषिक क्लासिक मित्र मंडळ सीबीडी बेलापूर आणि तृतीय पारितोषिक ए टू टाईप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तुर्भे यांनी स्विकारला.

            याशिवाय उत्कृष्ट गणेशमूर्ती पारितोषिक सीवूड्सचा गणराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सीवूड्स यांना तसेच संकल्पनेवर आधारित उत्कृष्ट देखावा पारितोषिक – करावेगावाचा महाराज सार्व. गणेशोत्सव मंडळ करावे, उत्कृष्ट सजावट पारितोषिक – नवयुवक मित्र मंडळ तुर्भे, उत्कृष्ट पारंपारिक गणेशोत्सव पारितोषिक – शिवसाई मित्र मंडळ कोपरखैरणे, उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पना पारितोषिक – बालगोपाल मित्र मंडळ ऐरोली, उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम पारितोषिक – सानपाड्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सानपाडा, उत्कृष्ट सामाजिक संदेश पारितोषिक – श्री स्वामी समर्थ गणेशोत्सव मंडळ सेक्टर 4 कोपरखैरणे यांनी प्रत्येकी 22 हजार, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह स्विकारले.

          गणेशोत्सव कालावधीत राज्यभरात अत्यंत लोकप्रिय झालेल्या, ‘कलाकारांचे कलाधिपती’ या शिर्षकांतर्गत ऐरोली सेक्टर 3 येथे साकारलेल्या, चौधरी कुटुंबाच्या घरगुती गणेशोत्सवाचे सर्वेसर्वा श्री.स्वप्निल चौधरी यांचा कुटुंबियांसमेवत विशेष सन्मान करण्यात आला.

          ‘गणपतीबाप्पा मोरया’च्या गजरात अत्यंत जल्लोषात व उत्साही वातावरणात नवी मुंबई महापौर चषक सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.

संबंधित पोस्ट

किरकोळ पेट्रोल पंपावरून घाऊक, संस्थांत्मक वापरासाठी इंधन वळविण्यात सक्त मनाई-  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

स्टॉप डायरिया’ अभियानाचा शुभारंभ • जिल्ह्यातील १.८४ लाख बालकांना झिंक गोळ्या व ओआरएसचे वितरण   • ३१ जुलैपर्यंत ‘स्टॉप डायरिया अभियान’

टेक-वारी 2.0’ अंतर्गत ‘जनरेटिव्ह एआय’ विषयावर विशेष तांत्रिक सत्र संपन्न

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

🎉 जालना महानगरपालिकेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी