vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

किरकोळ पेट्रोल पंपावरून घाऊक, संस्थांत्मक वापरासाठी इंधन वळविण्यात सक्त मनाई-  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

किरकोळ पेट्रोल पंपावरून घाऊक, संस्थांत्मक वापरासाठी इंधन वळविण्यात सक्त मनाई-  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक, प्रतिनिधी: जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक, डीलर्स तसेच व्यावसायिक व औद्योगिक संस्थांनी इंधन खरेदी-विक्री संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे. किरकोळ विक्री केंद्रांमधून व्यावसायिक, औद्योगिक अथवा संस्थात्मक ग्राहकांना अनधिकृतपणे इंधन पुरवठा अथवा इंधन वळविण्यास सक्त मनाई आहे, असे प्रकार आढळल्यास संबंधित पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्यासह फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री प्रसाद बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, अतिरिक्त धान्य पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की, किरकोळ ग्राहक आणि संस्थात्मक ग्राहक या दोन स्वतंत्र श्रेणी असून त्यांच्या इंधन खरेदीसाठी वेगवेगळ्या तरतुदी लागू आहेत. सर्वोच्च न्यायालयाने इंडियन ऑईल कॉर्पोरेशन विरूद्ध केरला स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉरपोरेशन (2018) 12 SCC 518 या प्रकरणातील निकालातही या दोन्ही ग्राहक वर्गांमधील भेद स्पष्ट केला आहे. त्यामुळे किरकोळ पेट्रोल पंपांद्वारे मोठ्या व्यावसायिक किंवा संस्थात्मक ग्राहकांना इंधन पुरवठा करणे नियमबाह्य ठरते.

केंद्र शासनाच्या द मोटार स्पिरिट हाय स्पीड डिझेल रेग्यूलेशन ऑफ सप्लाय ड्रीस्ट्रीब्युशन ॲण्ड प्रिव्हेंटेशन ऑफ मालप्रॅक्ट्रीसेस ऑर्डर 2005 तसेच राज्य शासनाच्या संबंधित आदेशांनुसार इंधन पुरवठा व वितरणातील गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठा साखळीत कोणत्याही प्रकारचा अनधिकृत व्यवहार, साठवणूक अथवा वळवण रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.

जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इतर संबंधित यंत्रणांमार्फत पेट्रोल पंप तसेच इंधन वाहतूक करणाऱ्या वाहनांची आकस्मिक तपासणी केली जाणार आहे.

अनधिकृत इंधन वळवण अथवा पुरवठा केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित डीलरचा परवाना तत्काळ निलंबित अथवा रद्द करण्यात येईल. तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ आणि इतर लागू कायद्यांनुसार संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी नियमांचे पालन करून कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत व्यावसायिक इंधन पुरवठ्यापासून दूर राहावे आणि इंधन वितरण व्यवस्थेची पारदर्शकता व शिस्त कायम राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

माफसूच्या विकसित कृषी संकल्प अभियानास राज्यभर उत्कृष्ट प्रतिसाद…

बांधा बांधावर शेतकरी-अधिकारी सुसंवाद-जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी शेतकऱ्यांच्या भेटीला शेतात

आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण..

राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर मतदान २३ एप्रिलला तर ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करताना आचारसंहिता नियमांचे पालन करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उद्योजकता विकास प्रशिक्षणातून महिलांचे सक्षमीकरण- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- उद्योजकता विकास प्रशिक्षणात 900 महिला सहभागी – जिल्हा वार्षिक योजनेतून 1 कोटी 62 लाखांची तरतूद