महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ; सभासदांना नूतनीकरणाची विशेष सवलत
छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी – धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, मंडळाचे सभासदत्व नोंदणी शुल्क रुपये ८००/- असून, त्यानंतर दरवर्षी सभासदत्व नूतनीकरणासाठी रुपये ३००/- शुल्क आकारण्यात येते.
सभासदत्व नूतनीकरणाच्या निर्धारित देय तारखेपासून ९० दिवसांचा वाढीव कालावधी (Grace Period) देण्यात येतो. या कालावधीत नूतनीकरण न केल्यास संबंधित सभासदाचे सभासदत्व नियमानुसार समाप्त होईल आणि त्यांना पुन्हा नवीन सभासद म्हणून नोंदणी करावी लागेल. त्यासाठी रुपये ८००/- नोंदणी शुल्क भरावे लागेल
तथापि, मंडळामार्फत नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यास झालेल्या विलंबामुळे ज्या सभासदांचा नूतनीकरणाचा निर्धारित कालावधी तसेच वाढीव कालावधी संपलेला आहे, अशा सभासदांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत रुपये ३००/- शुल्क भरून सभासदत्वाचे नूतनीकरण करण्याची विशेष सवलत देण्यात येत आहे.
तरी संबंधित सभासदांनी या विशेष सवलतीचा लाभ घेऊन दिनांक ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत आपले सभासदत्व नूतनीकरण करून घ्यावे. दिनांक १ जानेवारी २०२७ पासून नियमानुसार नवीन सभासदत्व नोंदणीसाठी रुपये ८००/- शुल्क भरावे लागेल, याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.