vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

|| परमवंदनीय भगवत्पाद् जगद्गुरु श्री रेणुकाचार्य ||   

|| परमवंदनीय भगवत्पाद् जगद्गुरु श्री रेणुकाचार्य ||

आध्यात्मिक वार्ता

परंपरा, परिवर्तन आणि सर्जनशीलता या त्रिसूत्रींचा जागर करणाऱ्या भगवत्पाद् जगद्गुरु श्री रेणुकाचार्य यांचा उद्या *लिंगोद्भव* दिवस किंवा *अवतार दिन* आहे. सर्वसामान्य भाषेत तो प्रकटदिन आहे.

या पवित्र दिवसाच्या पूर्वसंध्येला भगवत्पाद श्री रेणुकाचार्य यांचे आणि त्यांच्या विस्मृतीत गेलेल्या कार्याचे स्मरण करणे अत्यावश्यक आहे.

          ” *यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भूतले |तदा तदा अवतारोSयं गणेशस्य महितले ||* ” (स्कंदपुराण माहेश्वर खंड)- अर्थात ‘ ज्यावेळी धर्माला , शिवभक्तीला ग्लानी येते आणि ती क्षीण होऊन अधर्माचे वर्चस्व वाढते., त्यावेळी भगवान शिवांच्या आज्ञेनुसार शिवगण म्हणजेच गणेश या पृथ्वीवर अवतार घेतात .’

 वीरशैव – लिंगायत श्रद्धेनुसार शिवाचे पाच गणाधीश्वर प्रत्येक युगात शिवाचाराची अर्थात शिवधर्माची स्थापना करतात हे शिवगण म्हणजेच पंचाचार्य होत जगदारंभी श्रीरेवणाराध्य,

श्रीमरूळाराध्य, श्री एकोरामाराध्य आणि

श्रीविश्वाराध्य यांनी वीरशैवतत्त्व मताची स्थापना केली.

वीरशैव पंचाचार्य आणि त्यांच्या पीठांना एक प्रदीर्घ परंपरा आहे या पीठांचे प्राचीनत्व दाखविणारे अनेक ऐतिहासिक पुरावे संबंधित पीठांमध्ये उपलब्ध आहेत .या प्रमुख पीठांचे कर्नाटक , तमिळनाडू ,आंध्र आणि महाराष्ट्रात अनेक शाखामठ असून त्यातील अनेक मठ बसवपूर्वकाळातील आहेत हे सांगणारे अनेक शिलालेखीय ताम्रपटीय पुरावे देखील मिळतात.

येथे आरंभीच एका गोष्टीचा खुलासा करणे अत्यावश्यक ठरेल.

*भगवत्पाद जगद्गुरु रेणुकाचार्य हे वीरशैव संप्रदायातील आद्य आचार्य मानले जात असले तरी त्यांचे कार्य हे केवळ वीरशैव – लिंगायत संप्रदायापुरते मर्यादित नाही .ते एकूणच सनातन वैदिक धर्माला आणि आजच्या भाषेत बोलायचे तर हिंदू धर्माला देखील अधिक व्यापक करणारे आहे* ; हे भ.ज.गु.श्री रेणुकाचार्यांनी अगस्त्य मुनींना केलेल्या उपदेशातून म्हणजेच *’श्रीसिद्धान्तशिखामणी*या तत्वज्ञान ग्रंथामधून लक्षात येते.

भगवत्पाद जगद्गुरु श्री रेणुकाचार्यांचे स्मरण करीत असताना काही लोक त्यांच्या संदर्भात *वीरशैव धर्मसंस्थापक* असा उल्लेख करतात. काही जुन्या ग्रंथांमध्ये देखील असा उल्लेख आढळतो. मात्र याचा अर्थ *वीरशैव – लिंगायत हा स्वतंत्र धर्म होत नाही हे ध्यानात घेणे गरजेचे आहे*.

समाजाला धारण करणारी शक्ती ,समाजातील सर्व लोकांना त्यांचे – त्यांचे कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारी आणि समग्र समाजाच्या विकासासाठी, रक्षणासाठी आणि मानवतावादाचा जागर करण्यासाठी कटिबद्ध असलेली चैतन्यशक्ती ज्यावेळी आपली कर्तव्य कर्म करून अंतिमतः परशिव किंवा परब्रह्म स्वरूपात एकरूप होण्यासाठी योगमार्ग, भक्तिमार्ग किंवा आपल्याला अनुकूल असलेल्या अध्यात्ममार्गाचा अवलंब करते तेव्हा अशा तत्त्वाचा उल्लेख प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी *धर्म* या संज्ञेने केलेला आहे.

वीरशैव-लिंगायत संप्रदायाचे श्री काशीपीठाचे विद्यमान जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर चंद्रशेखर महास्वामीजी यांच्या शब्दात सांगायचे तर

” मानवी जीवन सुखकर व्हावे , ते विकसित व्हावे यासाठी प्राचीन ऋषीमुनींनी चार पुरुषार्थांची मांडणी समाजापुढे केली. या चार पुरुषार्थांमधला पहिला पुरुषार्थ म्हणजे धर्म होय .धर्मामुळेच अर्थ, काम ,मोक्ष या तीन पुरुषार्थांची प्राप्ती होते आणि म्हणूनच

” यतोSभ्युदय नि:श्रेयस सिद्धि: स धर्म : ”

अशी धर्माची व्याख्या केली जाते . ऐहिक सुख आणि पारमार्थिक मुक्ती यांचे साधन असलेला पुरुषार्थ म्हणजे धर्म होय. उत्तम आचरण म्हणजे धर्म होय. त्याच्या आचरणामुळेच जीवाला पुण्याची व पर्यायाने सुखाची प्राप्ती होते .म्हणूनच तैतरीय आरण्यकामध्ये “धर्मे सर्वं प्रतिष्ठितम् ” असे म्हटले आहे.(वीरशैव तत्त्वदर्शन ,पृष्ठ १३)

*धर्माचा हा व्यापक अर्थ मान्य असल्यामुळेच भारतातील हिंदुत्व तत्त्वपरंपरेतील विविध विचारधारांचा उल्लेख भागवत धर्म (वारकरी संप्रदाय), शैव धर्म (वीरशैव संप्रदाय, नाथ संप्रदाय ,काश्मिरी शैवमत इत्यादी ), जयकृष्णी धर्म (महानुभाव संप्रदाय) असा *धर्म* या संज्ञेने सहजपणे आलेला दिसतो.

त्यामुळेच हे उल्लेख स्वतंत्र धर्माचे निदर्शक नसून ते हिंदू धर्मातील ,हिंदू धर्मांतर्गत संप्रदायाचे उल्लेख असल्याचे आपण समजून घेतो याचे न्यायाने

*मानवता धर्माचा विजय असो, धर्मानेच विश्वाला शांती मिळते* असा उद्घोष करणाऱ्या वीरशैव -लिंगायत संप्रदायाचा उल्लेख काही ग्रंथांमध्ये सहजपणे *वीरशैव धर्म* असा आलेला आढळतो. मात्र वीरशैव लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून तो संप्रदाय आहे हे ध्यानात घेणे अत्यावश्यक आहे.

हिंदू शब्दाच्या व्याख्येवरच वादंग निर्माण करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. कारण हिंदू धर्म हा कोणत्याही विशिष्ट प्रेषिताचा , विशिष्ट देवतेचा किंवा उपासनेचा निर्देश करीत नाही. मात्र भारतीय परंपरेतील विविध संप्रदायांमधून व्यक्त होणारे धार्मिक सांस्कृतिक संदर्भ ध्यानात घेता हिंदू धर्माची व्याप्ती लक्षात येते.

ही व्याप्ती *हिंदू कोड बिला*च्या निमित्ताने अर्थात हिंदू संहिता विधेयकाच्या निमित्ताने भारतीय राज्यघटनेने अधोरेखित केलेली आहे.

समाजाला संघटित करण्यासाठी, त्याच्यामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जातीभेद , लिंगभेद, भाषाभेद ,प्रांतभेद यांच्या पलीकडे जाऊन समाज कल्याणचा विचार करणारी सनातन वैदिक परंपरेतील एक महत्त्वाची विचारधारा म्हणजे वीरशैव – लिंगायत संप्रदाय किंवा *शक्तीविशिष्टद्वैत सिद्धान्त* होय.

या सिद्धान्तातील श्रेष्ठ दार्शनिक ,समाजसंघटक आणि मार्गदर्शक म्हणून देखील. भगवत्पाद जगद्गुरु श्री रेणुकाचार्य यांच्या परंपरेचा विचारांचा परिचय आपण घेऊयात. 🙏

 

@ डॉ.श्यामा घोणसे , पुणे

संबंधित पोस्ट

.*🌹”पितृअष्टक”*🌹.

vishwatmaklokswamivarta

ओम नमः शिवाय🌹*       *🌹🙏!! शुभ प्रभात !!🙏🌹

श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरात अखंड शिवनाम सप्ताहास प्रारंभ

vishwatmaklokswamivarta

🌹🙏प्रभात पुष्प🙏🌹*

vishwatmaklokswamivarta

🚩🔱🌹 काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शिवाला समर्पित सर्वात प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हे वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत येथे आहे. हे मंदिर पवित्र गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे, आणि शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. 

घरात शंख ठेवावा का? ‘हे’ आहे शंखाचे महत्त्व व फायदे*

vishwatmaklokswamivarta