vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नव्या मुंबईत ऐरोलीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात हजारो नागरिकांची महामानवाला अभिवादन…

नव्या मुंबईत ऐरोलीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात हजारो नागरिकांची महामानवाला अभिवादन…

 

         नवी मुंबई प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘ज्ञान हीच शक्ती’ या संदेशाचा प्रत्यक्ष अविष्कार घडविणारे नवी मुंबई महानगरपालिकेने सेक्टर 15, ऐरोली येथे उभारलेले बाबासाहेबांचे स्मारक हे ‘ज्ञानस्मारक’ म्हणून सर्वत्र नावाजले जात आहे. आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नागरिकांनी याठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

          सध्या उन्हाचा कडाका जास्त असला तरी सायं. 6 वाजेपर्यंत 9400 हून अधिक नागरिकांनी स्मारकाला भेट दिली. संध्याकाळी 4 नंतर नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसमवेत मुलाबाळांसह याठिकाणी भेट देण्यास जास्त पसंती दर्शविल्याचे चित्र बघायला मिळाले व भेटी देणा-यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले दिसले. नवी मुंबईतून ठिकठिकाणाहून निघणा-या मिरवणूका, रॅली यांनीही स्मारकाला भेट देऊन अभिवादन करून पुढे जाण्यास पसंती दर्शविली.

          महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी स्मारकास भेट देऊन विनम्र अभिवादन केले. स्मारकाला भेट देणा-या नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या वतीने अल्पोपहार व चहापाणी व्यवस्था करण्यात आलेली होती. आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी याठिकाणी भेट देत सर्व सुविधांची पाहणी केली तसेच नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी उत्तम व्यवस्थेबद्दल नागरिकांनी महानगरपालिकेची प्रशंसा केली. संध्याकाळनंतर वाढलेला नागरिकांचा ओघ रात्री उशीरापर्यंत सुरू राहील असे चित्र होते.

  2021 मध्ये 5 डिसेंबरला स्मारकातील सुविधा लोकार्पण झाल्यानंतर या स्मारकाकडे नागरिकांचा सातत्याने ओढा राहिला असून मागील सव्वातीन वर्षात 3 लाख 61 हजार 445 इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांनी तेथील रजिस्टरमध्ये नोंद करून या ठिकाणी भेट दिली आहे. येथील विविध सुविधा कक्षांना भेट देत बाबासाहेब आपल्यासोबत आहेत अशी भावना अनेक नागरिकांकडून व्यक्त होत असून अनेक मान्यवर, व्याख्याते व अभ्यासकांनीही जगातील बाबासाहेबांच्या स्मारकापेक्षा हे आगळेवेगळे स्मारक असल्याचे अभिप्राय दिले आहेत.

          स्मारकातील समृद्ध ग्रंथालयात 5282 इतक्या मोठ्या संख्येने बाबासाहेबांनी लिहिलेली व बाबासाहेबांसह इतर महनीय पुरुषांच्या चरित्रावर आधारित मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. तसेच ऑडिओ व्हिज्युअल ‘इ- लायब्ररी’ सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे हे ग्रंथालय म्हणजे सर्वसामान्य वाचकांप्रमाणेच अभ्यासकांसाठीही ज्ञानसमृद्ध असा ठेवा आहे. या ठिकाणचा ‘विशेष संविधान कक्ष’ संविधानाची महती मनामनात रुजवण्यासाठी उपयोगी आहे. त्यामध्ये संविधानाच्या मूळ प्रतीची प्रतिकृती नागरिकांना हाताळता येत असून संविधानविषयक ग्रंथसंपदा त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणा-या जिज्ञासूंसाठी अत्यंत उपयोगी आहे.
 बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीत राबविण्यात आलेली ‘जागर’ ही विशेष व्याख्यानमाला नागरिकांच्या अतिशय उत्तम प्रतिसादामुळे यशस्वी झाली. सुप्रसिध्द व्याख्याते डॉ.हरीश वानखेडे, प्रा.प्रवीण दवणे, श्री.अरूण म्हात्रे, प्रा.हर्षद भोसले, प्रा.मृदुल निळे यांच्या व्याख्यानांप्रमाणेच नामांकित अभिनेत्री श्रीम.छाया कदम यांची मुलाखतही रसिकांना भावली. ॲड.निखिल अडसुळे, श्री.आनंद बनसोडे, श्री.सुरज वाघमारे, श्री.अश्विन नंदापूरकर या विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजविणा-या युवा व्याख्यात्यांच्या ‘भिमा तुझ्या जन्मामुळे..’ सुसंवाद कार्यक्रमासही रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. नागरिकांची वाढती गर्दी पाहून सभागृहाबाहेर एलईडी स्क्रिन लावून व्याख्याने थेट प्रक्षेपित करावी लागली हा सध्याच्या काळातील व्याख्यानांना अशाप्रकारे गर्दीचा दुर्मीळ अनुभव या व्याख्यानमालेव्दारे घेता आला.
 अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ग्रंथालयांप्रमाणेच बाबासाहेबांचे जीवनचरित्र दुर्मीळ छायाचित्रांतून मांडणारे विशेष छायाचित्र दालन हे स्मारकाचे खास आकर्षण असून त्यामधून अनेकांना प्रेरणा मिळत असल्याचे अभिप्राय दिले जातात. आभासी चलचित्र प्रणालीद्वारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची संधी देणारा अत्याधुनिक होलोग्रफिक प्रेझेंटेशन शो उपस्थितांना भारावून टाकतो. याशिवाय एकाच वेळी 200 व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्य ध्यान केंद्र एक वेगळी अनुभूती देते. अशा विविध वैशिष्ट्यांमुळे हे ज्ञानस्मारक सर्वांचेच आकर्षण केंद्र झाले असून या माध्यमातून बाबासाहेबांचे शिक्षण व ज्ञानातून प्रगतीचे विचार जनमानसात प्रसारित होत आहेत.
 नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही जयंतीदिनी ज्ञानस्मारकाला भेट देत बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले तसेच जयंतीनिमित्त स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, ऐरोली विभागाचे सहा.आयुक्त श्री.सुनिल काठोळे व इतर अधिकारी उपस्थित होते.
     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त या स्मारकाला लक्षवेधक विद्युत रोषणाई करण्यात आली असून हे देखील जयंतीदिनाचे खास असे आकर्षण आहे.
0000

संबंधित पोस्ट

बाल मित्र कॅरम क्लबच्यावतीने भायखळा – माझगांव लव्हलेन येथे भव्य कॅरम स्पर्धा संपन्न

vishwatmaklokswamivarta

“सन्मान ‘ती’चा-अभिमान छत्रपती संभाजीनगरचा” जागतिक महिला दिनी (दि.८) सुपर वुमन बाईक रॅली

वाशिम, भंडारा, अंबरनाथ आणि पालघर येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना गती द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महसूल विभाग शासनाचा कणा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- महसूल सप्ताहाचा जिल्हास्तरीय शुभारंभ- नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी सकारात्मकतेने काम करण्याचे आवाहन- जिल्हाधिकारी कार्यालय, क्षेत्रीय स्तरावरील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

उत्तर-पूर्वे हा भाग ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ चा ‘कोहिनूर’ – पीयुष गोयल, केंद्रीय मंत्री

vishwatmaklokswamivarta

म्हाडाच्या मुंबई मंडळाने 149 दुकानांच्या ई लिलावासाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. इच्छुकांना25 ऑगस्टपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज करता येणार