मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल…
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबई सीएसएमटी आणि महापालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. जे.जे. उड्डाणपुला मार्गे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना मुंबई पोलिस आयुक्तालय मार्गे पुढे मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेट स्थानक मार्गे जाऊ देण्यात येणार आहे.
आझाद मैदानासोबतच सीएसएमटीच्या बाहेरही आंदोलकांची मोठी गर्दी झाल्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वेगळे निर्णय घेऊन विविध मार्गात बदल केले आहेत. सीएसएमटीच्या दिशेने मेट्रो जंक्शन ते आझाद मैदानच्या मुख्यद्वाराजवळील महापालिका मार्गही बंद ठेवण्यात आला आहे. फॅशन स्ट्रीटहून सीएसएमटीकडे जाणारा आणि आझाद मैदानला लागून असलेला हजारीमल सोमानी मार्गही वाहतुकीसाठी बंद केला आहे.
हुतात्मा चौकाहून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक तसेच मंत्रालयासमोरील मॅडम कामा रोड ते मरीन ड्राईव्ह जंक्शन हे मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत. मागील दोन दिवसांपासून आंदोलकांनी फ्री वेवर वाहने उभी केली होती, त्यामुळे बंद असलेला फ्री वे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह आणि वडाळा वाहतूक पोलिसांना अतिरिक्त कुमक देण्यात आली आहे. वडाळा व आझाद मैदान या दोन चौक्यांना प्रत्येकी पस्तीस पोलिसांची मदत मिळाली आहे. मागील दोन दिवसांपासून महापालिकेच्या इमारतीसमोरील मुख्य रस्त्यावर आंदोलकांची गर्दी वाढली आहे आणि त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा दिसून येत आहेत. सीएसएमटी स्थानकातही मोठ्या प्रमाणावर आंदोलक थांबत असल्याचे दिसून आले आहे.