
59 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद
आरोग्य प्रतिनिधी नागरी भागात अतिशय दाटीवाटीने वसलेल्या तसेच झोपडपट्टी सद्यृश्य भागात आरोग्य सेवांपासून नागरिक वंचित राहू नयेत यादृष्टीने प्राथमिक आरोग्य संस्थांना सक्षम करण्यासाठी तसेच सातत्यपूर्ण रितीने गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी केंद्र शासनाकडून 15 व्या वित्त आयोगांतर्गत राज्य स्तरावर शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत.
त्यानुसार शासनाकडून नवी मुंबई महानगरपालिकेस 59 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर करण्यात आलेली असून नमुंमपा कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 59 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. याव्दारे विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी तसेच सुलभ व परवडणारी आरोग्य सेवा प्रदान करुन आरोग्य निर्देशांक वाढविण्याचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत आहे.
या शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये डॉक्टर, नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी उपलब्ध असून सकाळी 11 ते सायं. 7 या वेळेत नागरिक येथील आरोग्य सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
या केंद्रामार्फत नागरिकांना विविध आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये – (1) गरोदरपण आणि बाळंतपणातील काळजी(2) नवजात शिशू आणि बाळांच्या आरोग्य सेवा(3) बालके आणि किशोरवयीन यांच्या आरोग्य सेवा(4) असंसर्गजन्य रोगांची तपासणी, प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापन(5) मुलभूत मौखिक आरोग्य सेवा- अशा विविध आरोग्य सेवांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, संसर्गजन्य आजारांपासून बचाव कसा करावा, वैयक्तिक स्वच्छता आणि पोषणाचे महत्त्व याबद्दलही नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते. या आरोग्यवर्धिनी केंद्रांमुळे नागरिकांना त्यांच्या घारापासून जवळ प्राथमिक आरोग्य सेवा सहज उपलब्ध होत असल्याने या केंद्रांना चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.



