vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

वन्यजीव, पर्यावरण रक्षणासाठी कुंडल वन प्रबोधिनीकडून जनजागृती- मध्य प्रदेशातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद

वन्यजीव, पर्यावरण रक्षणासाठी कुंडल वन प्रबोधिनीकडून जनजागृती- मध्य प्रदेशातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद

     सांगली, प्रतिनिधी : वन्यजीव रक्षण, पर्यावरण रक्षण या बाबींच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी शासनाच्या वन विभागामार्फत दरवर्षी 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. या सप्ताहानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी, कुंडल वन प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेत असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थींनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

     शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जाण निर्माण होण्यासाठी, उद्याचे पर्यावरणसजग नागरिक निर्माण करण्यासाठी आग्रही असणारे प्रबोधिनीचे संचालक शतानिक भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. माधवी भारती, रोहित सोलंकी, संजय सोलंकी व सुदर्शन सोलंकी या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, रामापूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोराळे येथे भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वने, वन्यजीव, पर्यावरण, विविध वृक्ष प्रजाती या अनुषंगाने त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले व वन्यजीव, वने, पर्यावरण रक्षणाचे, वृक्ष लागवडीचे महत्त्व विशद केले.

   निसर्गातील प्रत्येक घटकाचे, प्रत्येक परिसंस्थेचे, प्रत्येक अधिवासाचे वेगळे महत्व असून त्यांचे रक्षण करणे गरजेचे असल्याचे सांगून पर्यावरण रक्षणकामी उद्याचे भवितव्य असलेला विद्यार्थीवर्ग मोलाची भूमिका बजावू शकतो. जल, जंगल, जमीन सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक असून ‘उद्याच्या श्वासासाठी’ जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे कुंडल वन प्रबोधिनीतील व्याख्याता निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी यांनी सांगितले.

      प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी प्लास्टिक प्रदूषण, वाढते तापमान, हवा, पाणी, माती, वन्यजीव, विविध वृक्ष प्रजाती आदि विषयांना स्पर्श करीत पर्यावरणपूरक जीवनशैली कशी अवलंबावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवीच्या वापरासाठी आग्रही असणं, छोट्या अंतरासाठी सायकलचा वापर करणे, पायी चालणे; रंगपंचमीला रासायनिक रंगांऐवजी बीट, झेंडू, पळसाची फुले यांपासून बनवलेले नैसर्गिक रंग वापरणे, फटाकेविरहित दिवाळी साजरी करून, डीजेचा वापर कमी करून हवेचे व ध्वनीचे प्रदूषण कमी करणे, पाण्याच्या गळणाऱ्या नळांची त्वरित दुरुस्ती करणे, वीज, पाणी व प्रत्येक संसाधनाचा जपून वापर करणे इत्यादी बाबींबाबत मार्गदर्शन केले.

    न्यू इंग्लिश स्कूल, रामापूरचे मुख्याध्यापक भगवान भंडारे, संस्थेचे अध्यक्ष जहांगीर मुल्ला व इतर शिक्षकवृंद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोराळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष प्रवीण पाटील व इतर शिक्षकवृंद, विवेक मदने, दीपक पवार, देवकुमार दुपटे आदि याप्रसंगी उपस्थित होते.

 

00000

संबंधित पोस्ट

डॉ बाबासाहेब आंबेडकर संकल्प भूमी स्मारक कामाची केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी* 

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

लंडनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र’ उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

मोटार वाहन कर व दंड वसुली मोहिमेअंतर्गत कामगिरीची माहिती जाहीर

बीड जिल्ह्यात देवगाव इथे शेकडो वर्ष जुन्या खंडोबा जत्रेला सुरवात, या निमित्त रंगला कुस्त्यांचा सामना.

vishwatmaklokswamivarta