महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्मारकस्थळी वैचारिक अभिवादन,5 डिसेंबरला डॉ.अजित रानडे यांचे ‘आर्थिक लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर व्याख्यान
महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्मारकस्थळी वैचारिक अभिवादन,5 डिसेंबरला डॉ.अजित रानडे यांचे ‘आर्थिक लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर व्याख्यान
नवी मुंबई प्रतिनिधी- ऐरोली से.15 येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लौकिक अल्पावधीतच ‘ज्ञानस्मारक’ म्हणून केला जात आहे. येथील समृध्द ग्रंथालय, त्यामधील अत्याधुनिक ई लायब्ररी, बाबासाहेबांचे जीवनचरित्र साकारणारे दुर्मीळ छायाचित्रांचे दालन, बाबासाहेब प्रत्यक्ष आपल्याशी संवाद साधताहेत अशाप्रकारे आभासी चलचित्र दालन, ध्यानकेंद्र अशा विविध सुविधा कक्षांव्दारे अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी व स्मारकाला रजिस्टरमध्ये नोंद करून भेटी देणा-या 4 लक्ष 34 हजाराहून अधिक देशी-परदेशी नागरिकांनी स्मारकाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
सन 2021 मध्ये महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला स्मारकातील सुविधांचे लोकार्पण होऊन स्मारक नागरिकांसाठी खुले झाले होते. येथे नियमितपणे आयोजित केल्या जात असलेल्या ‘विचारवेध’ या व्याख्यानशृंखलेमध्ये महाराष्ट्रातील व देशातील अनेक नामांकित साहित्यिक, व्याख्याते यांनी विविध विषयांवर वैचारिक जागर केला आहे.
या ‘विचारवेध’ व्याख्यानशृंखलेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार दि.05 डिसेंबर 2025 रोजी, सायं. 6 वाजता, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, लेखक व व्याख्याते डॉ. अजित रानडे हे ‘आर्थिक लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. तरी नागरिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिक आदरांजली अर्पण करण्यासाठी स्मारकस्थळी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार, दि. 6 डिसेंबर 2025 रोजी, मोठया प्रमाणावर नागरिक स्मारकाला भेट देत असतात हे लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याठिकाणी अल्पोपहारासह, चहापानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी याठिकाणी अभिवादनाकरिता अलोट जनसमुदाय मोठया संख्येने उपस्थित असतो हे लक्षात घेत त्याठिकाणी येणा-या देशीपरदेशी नागरिकांनी ऐरोली नवी मुंबई येथील महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकालाही आवर्जून भेट द्यावी याकरिता स्मारकाची माहिती देणारा स्टॉल त्याठिकाणी उभारण्यात येत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऐरोली येथे नवी मुंबई महानगरपालिकेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व अति आयुक्त श्री.सुनील पवार आणि उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली सुव्यवस्थित नियोजन केले असून नागरिकांनी 5 डिसेंबर रोजी व्याख्यानाला व 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन करण्यासाठी या ज्ञानस्मारकाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे