
चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शताब्दी वर्षात समतामूलक भारताचा
रायगड, प्रतिनिधी- महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाड (रायगड) येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रम पार पडला. या शताब्दी वर्ष कार्यक्रमाचा आरंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. चवदार तळ्याचे जलशुद्धीकरण आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटी 80 लाख निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रवीण दरेकर, महाड नगराध्यक्ष सुनिल कविस्कर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, विविध विभागांचे अधिकारी, विविध सामाजिक संघटना आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी चवदार तळ्याच्या ठिकाणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णांकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून त्यांना मानवंदना देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आपल्या भाषणाची सुरुवात करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 1923 मध्ये सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याचा कायदा झाला तरी समाजातील काही घटकांनी त्याची अंमलबजावणी रोखली. या अन्यायाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला चवदार तळे सत्याग्रह हा सामाजिक समतेचा क्रांतिकारी टप्पा ठरला. हा संघर्ष केवळ पाणी पिण्यासाठी नव्हता, तर विषमता आणि अस्पृश्यतेच्या व्यवस्थेविरुद्ध उभारलेला मानवतेचा लढा होता.
सत्याग्रहामुळे देशातील सर्व सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले झाले आणि समतेची पायाभरणी झाली. पुढील पिढीपर्यंत हा संघर्षाचा इतिहास पोहोचविण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाचा उल्लेख करत, हे ठिकाण स्वच्छ, पवित्र आणि प्रेरणादायी स्वरूपात विकसित केले जाईल, असे सांगितले. तसेच राज्य सरकारतर्फे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अनुसूचित जातींवरील अत्याचारातील पीडित कुटुंबातील 98 जणांना शासकीय सेवेत नियुक्ती निर्णय, पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दिलेला निधी, चैत्यभूमीवरील स्मारकाचे काम, तसेच लंडन व जपानमध्ये बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी केलेल्या उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला.
याशिवाय, बौद्धगया येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेबांच्या नावाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यासन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.“भारतीय संविधानाने प्रत्येकाला समान हक्क दिले आहेत. या संविधानामुळेच भारत प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे विषमता आणि अस्पृश्यता संपवून समतामूलक समाज निर्माण करण्याचा संकल्प सर्वांनी करावा,” असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भव्य ‘भीमसृष्टी’ स्मारक उभारण्याची सूचना मांडली.ऐतिहासिक स्थळाचा जागतिक दर्जाचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समानता व सामाजिक न्यायाच्या विचारांवर मार्गक्रमण करत समाजातील एकजूट अधिक मजबूत करण्याचे आवाहन करीत देश आणि राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी नमूद केले.महाड येथील चवदार तळ्याच्या विकासासाठी ५५ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगत रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी हा प्रकल्प शताब्दी वर्षापूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी येथे आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर देत, रायगड येथे ‘शिवसृष्टी’ आणि महाड येथे ‘भीमसृष्टी’ उभारुन या ऐतिहासिक स्थळांचा सर्वांगीण विकास करून सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक भक्कम करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट प्रास्ताविकात म्हणाले, महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या विकासासाठी सुमारे ५५ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या ठिकाणाचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची सुरुवात याच ठिकाणाहून झाल्याने या स्थळाला जागतिक स्तरावर नेण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिक्षण, वसतिगृह आणि सामाजिक न्यायाच्या योजनांद्वारे बहुजन समाजाच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा देशातील पहिला उपक्रम,अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील वारसांपैकी छाया अश्विन कांबळे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मुलींचे शासकीय वसतिगृह, गौरीपाडा, कल्याण येथे पूनम दिनेश जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, शहापूर येथे सारिका बलभीम बनसोडे यांना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अनुष्का सुरेंद्रकुमार यांना मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, गोधळपाडा, अलिबाग, येथे पुजा नितीन मस्के यांना संत जनाबाई मुलीचे शासकीय वसतिगृह, पुणे येथे धिरज प्रकाश पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर, येथे अशा एकूण ९८ वारसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय सेवेत नियुक्तीचे आदेश वितरण करण्यात आले.
०००



