vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाथरे येथे पाहणी-राहाता तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान ; १०० टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश 

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाथरे येथे पाहणी-राहाता तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान ; १०० टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

 

शिर्डी, प्रतिनिधी :- अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे राहाता तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या आणि अन्य नुकसानीचे महसूल व कृषी भागाने एकत्रितपणे १०० टक्के अचूक पंचनामे करून अहवाल सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले.

गुरुवारी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच, बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी मौजे पाथरे (बु.) येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

राहाता तालुक्यातील पाथरे (बु.) येथील शेतकरी संजय भाऊसाहेब घोलप व गोपालक सोपान घोलप यांच्या शेताला व गोठ्याला पालकमंत्र्यांनी भेट दिली. वादळी वाऱ्यामुळे विजेची तार अंगावर पडून आणि विद्युत धक्का बसल्याने ९ गायी दगावल्याच्या दुर्दैवी घटनेची त्यांनी पाहणी केली. मंत्री विखे पाटील यांनी घोलप कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना धीर दिला. यावेळी ‘घोलप कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करून शासन स्तरावरून तातडीने मदत कशी मिळेल, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत,’ अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच, वादळाने पडलेल्या वीजवाहक तारा व विजेच्या खांबांच्या समस्या तातडीने सोडवून गावातील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देशही वीज वितरण कंपनीला दिले.

राहाता तालुक्यात १८ मार्च, ३० मार्च व १ मार्च २०२६ रोजी झालेल्या पावसाने १ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील सुमारे २ हजार ७५९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, कांदा, द्राक्ष, मका, डाळिंब, हरभरा, टरबूज आणि आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी पाहणीनंतर दिली. याशिवाय शेतामध्ये ठेवलेल्या उत्पादित मालाचे तसेच वाऱ्याच्या वेगाने शेडनेट व पॉलीहाऊसचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत झालेल्या पावसाने ४२ हजार ६१८ शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी पुन्हा जिल्ह्याच्या बहुतांशी भागात झालेल्या पावसाने जामखेडमध्ये १ पशुधन दगावले असून, संगमनेरमध्ये २, राहुरीत ९ आणि कोपरगावमध्ये १ घराचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे १०० टक्के पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

या पाहणी दौऱ्यावेळी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, नायब तहसीलदार हेमंत पाटील, मंडळ कृषी अधिकारी रमेश चौपडे, सहायक कृषी अधिकारी श्रीमती मीना जाधव, वीज वितरण कंपनीचे अभियंता गाडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संपत तांबे उपस्थित होते. तसेच, बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब कडू, सरपंच उमेश घोलप, संचालक अशोकराव घोलप, आबासाहेब घोलप, भाऊसाहेब घोलप, आप्पासाहेब दिघे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.अजूनही काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला उत्पादित शेतमाल आणि जनावरे सुरक्षित स्थळी ठेवण्याबाबत शक्य तेवढे नियोजन करावे आणि संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने विकास कामे करावीत- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रशासकीय इमारत आणि नियोजन भवनाची पाहणी-प्रशासकीय इमारत व नियोजन भवनाचे कामे करतांना टिकाऊ व दर्जेदार कामे करावी – अजित पवार

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेचे 366.80 कोटींचे विक्रमी करसंकलन ! कर संकलनात योगदान देणाऱ्या करदात्यांचे महापालिकेकडून आभार; 1 जुलैपासून विलंब दंड लागू!

रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी मतदारयादीतील ‘मॅपिंग’ प्रक्रियेत सहभागी व्हावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी सुरुवात

शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

vishwatmaklokswamivarta