vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेगाव येथे २५ ते २८ फेब्रुवारी ‘राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे’ आयोजन;Ø महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते होणार शुभारंभ…Ø मेळाव्यात सहभागी होण्याचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन

शेगाव येथे २५ ते २८ फेब्रुवारी ‘राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे’ आयोजन;Ø महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते होणार शुभारंभ…Ø मेळाव्यात सहभागी होण्याचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन

 

बुलढाणा/शेगाव: प्रतिनिधी आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथे २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या भव्य मेळाव्याचा शुभारंभ २५ फेब्रुवारी रोजी महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार असून, याप्रसंगी राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी २१ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे आढावा बैठक घेऊन प्रशासकीय यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले .

 

या चार दिवसीय मेळाव्यामध्ये दररोज आरोग्य तपासणी व आवश्यक औषधींचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. याकामी आरोग्य विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, सर्व आयुष वैद्यकीय अधिकारी व फार्मासिस्ट यांनी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून आपली सेवा प्रदान करावी, अशा सूचना मंत्री महोदयांनी दिल्या आहेत. मेळाव्यात ६६ औषधी स्टॉल्स व ३५ हून अधिक आरोग्य तपासणी स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तळागाळातील गरजू लोकांपर्यंत या मेळाव्याची माहिती पोहोचवण्यासाठी आशा वर्कर्सनी घरोघरी जाऊन प्रभावीपणे प्रबोधन करावे. विशेषतः २६ फेब्रुवारी रोजी आशा वर्कर्ससाठी ‘आजीबाईचा बटवा’ या घरगुती आयुर्वेदिक उपचार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून, या प्रशिक्षणास सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे.

 

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी २६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सुमारे २००० ते २५०० प्रगतशील शेतकऱ्यांसाठी वनौषधी लागवड, प्रक्रिया व विपणन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचा उपयोग करून घेण्यासाठी कृषी विभाग व ‘आत्मा’ यंत्रणेने सूक्ष्म नियोजन करावे. या ठिकाणी देशभरातील नामवंत औषध कंपन्या सहभागी होणार असून, त्यांच्यामार्फत शेतकरी उत्पादित मालाच्या खरेदी संदर्भात करारही करण्यात येणार आहेत. तसेच शिक्षण विभागाने २७ फेब्रुवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘आयुष आहार’ या विषयावर प्रबोधन आयोजित करावे व जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतून विद्यार्थी वेळेपूर्वी पोहचतील याची दक्षता घ्यावी.

 

परिवहन विभागाने बसस्थानके व बसेसमध्ये मेळाव्याच्या माहितीचे स्टिकर्स लावून नागरिकांना प्रोत्साहित करावे. २७ फेब्रुवारी रोजी मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर पार पडेल. तसेच ‘वयोश्री’ व ‘एडीआयपी’ योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांची आणि ६० वर्षांवरील वृद्धांची आरोग्य तपासणी व साहित्य नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य व समाज कल्याण विभागाच्या मदतीने विशेष मोहीम राखावी. पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि पार्किंगचे चोख नियोजन करावे, तसेच नगरपरिषदेने मेळावा परिसरातील स्वच्छतेचे व्यवस्थापन करावे, असे निर्देशही मंत्री महोदयांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यावेळी प्रशासकीय सज्जतेचा आढावा सादर केला. राष्ट्रपती कार्यालयाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येत असून, सर्व शासकीय यंत्रणा हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. या आढावा बैठकीला जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

समृद्धी महामार्ग अपघात : आठ मृतांच्या कुटुंबीयांना ४० लाखांची मदत-मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी रुपये ५ लाख रूपये

प्रत्येक जिल्ह्यात गोटुल केंद्र स्थापन होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

vishwatmaklokswamivarta

भूमि अभिलेख विभागातील कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्नांवर कामबंद आंदोलन..

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज 2025’ संमेलन‘वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

हरवाडी ग्रामपंचायत च्या वतीने गावकऱ्यांच्या स्वप्नातील पूर बांधण्याचे कामाला सुरुवात व स्वच्छ पाणी देणाऱ्या RO प्लांटच्या कामाला सुरुवात… 👏🏻

महाराष्ट्रातील बंदर विकासाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय मान्यता मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट