vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

संभाव्य ‘एल-निनो’ या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करण्याचे लोकप्रतिनिधींमार्फत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे नवी मुंबईकर नागरिकांना आवाहन     

संभाव्य ‘एल-निनो’ या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करण्याचे लोकप्रतिनिधींमार्फत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे नवी मुंबईकर नागरिकांना आवाहन

          नवी मुंबई प्रतिनिधी-

          नवी मुंबई महानगरपालिकेच्या एप्रिल महिन्याच्या तहकूब महासभेत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि सर्व नगरसेवकांसमोर निवेदन करीत पाणीपुरवठा, स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहर स्वच्छता, धोकादायक इमारतींबाबत घ्यावयाची दक्षता व कार्यवाही, मतदार याद्यांचे पुनरावलोकन (SIR) कार्यक्रम तसेच जनगणना विषयक कार्यक्रम यामध्ये नागरिकांचे संपूर्ण सहकार्य आणि सक्रिय सहभाग मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

          पाणीपुरवठा विषयक सद्यस्थिती विशद करताना आयुक्तांनी सध्या ‘एल-निनो’ या जागतिक हवामान बदलामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणा-या जलवितरण विषयक उपाययोजना आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नागरिकांचे यामध्ये अपेक्षित असलेले सहकार्य याविषयी भाष्य केले.

          नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोरबे धरणातून व म.औ.वि.मं.च्या बारवी धरणातुन पाणी पुरवठा होतो. मोरबे धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 190.890 एम.सी.एम. इतकी असून, सद्यस्थितीत धरणात 82.557 द.ल.घ.मी. इतका (43.24%) इतका पाणी साठा उपलब्ध आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली.

          त्यापैकी 1 महिन्यांचा राखीव साठा वगळता प्रत्यक्ष 51.957 एम.सी.एम. (27.22%) इतका पाणी साठा आज उपलब्ध आहे असे स्पष्ट करीत शहराची दैनंदिन पाणी पुरवठयाची गरज लक्षात घेता, उपलब्ध जलसाठा दि. 07 ऑगस्ट 2026 पर्यंत म्हणजेच 103 दिवस पुरू शकेल असे त्यांनी सांगितले.

          सन 2026 मध्ये ‘एल-निनो’ या जागतिक हवामान बदलामुळे भारतातील मोसमी वाऱ्यावर परिणाम होऊन या वर्षी सरासरी पावसाचे प्रमाण 92% ते 94% इतके राहणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तविलेला आहे याची माहिती आयुक्तांनी दिली. याविषयी मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना भाष्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

          सन 2007 ते 2025 या कालावधीत मोरबे धरण क्षेत्रातील पर्जन्यमान लक्षात घेतले तर सरासरी 3617 मि.मी. इतक्या पावसाची वार्षिक नोंद झालेली दिसते. मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी साधारणत: 3500 मिमी. इतका पाऊस धरण क्षेत्रात होणे आवश्यक असते.

         या अनुषंगाने यावर्षीचा शिल्लक पाणी साठा गृहित धरला तर मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 3600 मिमी. इतका पाऊस यावर्षी होण्याची आवश्यकता आहे. तथापि, एल-निनोच्या प्रभावामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षीच्या पावसाची सरासरी 92 टक्के गृहित धरल्यास, मोरबे धरण क्षेत्रात साधारणपणे 3327 मिमी. इतक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे यावर्षी मोरबे धरण भरण्याची शक्यता खूपच कमी आहे ही वस्तुस्थिती सभागृहाच्या लक्षात आणून देण्यात आली. त्याचप्रमाणे पुढच्या वर्षीच्या पर्जन्यमानाचा विचारही यावर्षीच करणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले.

          या वस्तुस्थितीचा विचार करता नागरिकांनी पाणी वापरामध्ये बचत करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सर्व नगरसेवकांनी आपल्या क्षेत्रातील नागरिकांना पाणी बचतीचे व पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन करावे. यामध्ये प्रामुख्याने वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळणे, पाणी साठवण टाक्या भरुन वाहणार नाहीत याची दक्षता घेणे त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे महत्व ओळखून त्याचा काळजीपूर्वक वापर करणे याविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करावी असे सर्व नगरसेवकांना आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महासभेमध्ये आवाहन केले. 00000

संबंधित पोस्ट

धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी ११ व १३ एप्रिलला शिबिराचे आयोजन

कान्होजी आंग्रे वनउद्यान अलिबाग येथे वन कट्टाचे उद्घाटन संपन्न..

छत्रपतींच्या जयघोषात, शिवमय वातावरणात भव्य व दिमाखदार“जय शिवाजी जय भारत”पदयात्रा संपन्न

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्र्यांनी दाखविली चित्ररथांना हिरवी झेंडी

उन्हाळ्यात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सुचना जारी..