vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कामगारांच्या कल्याणातून घडतोय समृद्ध महाराष्ट्र ! १ मे कामगार दिनानिमित्त लेख….

कामगारांच्या कल्याणातून घडतोय समृद्ध महाराष्ट्र !१ मे कामगार दिनानिमित्त लेख….

राज्य प्रतिनिधी-दरवर्षी १ मे महाराष्ट्र दिन हा कामगार दिन म्हणूनही उत्साहाने साजरा केला जातो. देशात महाराष्ट्र हा अतिशय कुशल अशा कामगारांचा प्रांत म्हणून ऐतिहासिक काळापासून ओळखला जातो. देशाला दिशादर्शक अशा अनेक कामगार कायद्यांची निर्मिती महाराष्ट्राने केली आहे. कामगारांचे कायदे, कामगारांच्या संघटना, कामगारांसाठी आरोग्य व अन्य सुविधा आणि कामगारांच्या कुटुंबीयांना देखील मोठ्या प्रमाणात सुविधा देणारे प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते. त्यामुळे एक मे रोजी कामगार दिन साजरा करताना संघटित, असंघटित सर्व क्षेत्रातील कामगारांनी आपल्या कायद्यांची माहिती करुन घेणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाने तयार केलेल्या सर्व कायद्यांचा कामगारांना लाभ होण्यासाठी कामगार विभाग कटिबद्ध असून कामगारांच्या कल्याणातूनच समृद्ध महाराष्ट्र घडत आहे..

कामगारांच्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, त्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी नाविन्यपूर्ण आणि दूरदर्शी योजना, दूरदर्शी उद्दिष्टे आणि हितकारक धोरणे परिणामकारकरित्या राबवून महाराष्ट्राने इतर राज्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीतही हा विभाग मोलाचे योगदान देत आहे. या विभागांतर्गत संघटीत व असंघटीत कामगारांसाठी व्यापक स्वरुपात काम केले जात असून, त्यांच्या कल्याणासाठी कामगार कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी व विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

विभागाचे उद्दिष्ट व कार्य,औद्योगिक संबंध अधिक दृढ करणे, कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवणे आणि औद्योगिक सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करणे ही कामगार विभागाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. राज्यातील कामगारांसाठी आवश्यक कायदे तयार करणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम या विभागामार्फत सातत्याने केले जाते. औद्योगिक वादांचे प्रतिबंध व तातडीने निराकरण करण्यासाठीही हा विभाग कटिबद्ध आहे. तसेच विभागाच्या कार्यक्षेत्रातील उद्योगांमध्ये कामगारांची सुरक्षा, त्यांचे आरोग्य आणि कल्याणासाठी प्रोत्साहन दिले जाते.

कामगारांना संरक्षण,कामगारांसाठी शासनाने चार महत्त्वपूर्ण कामगार संहितांद्वारे संरक्षण दिले आहे. यामध्ये वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कार्यस्थिती संहिता आणि सामाजिक सुरक्षा संहिता यांचा समावेश होतो. या संहितांमुळे कामगारांचे किमान वेतन, कामाच्या वेळा, बोनस यांसारख्या महत्त्वाच्या बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच नव्याने कामगारांना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले असून, पारदर्शकता वाढीस लागली आहे. सामाजिक सुरक्षा संहितेमध्ये प्लॅटफॉर्म वर्कर्स- उदा. स्विगी, ॲमेझॉनसारख्या घरपोच सेवा देणाऱ्या कामगारांसाठी देखील स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या वतीने नव्या नियमावलीचा मसुदा- कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या संहितांच्या धर्तीवर राज्य शासनाने राज्यासाठी नवीन नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. तसेच दोन्ही मसुद्यांवर हरकती व सूचना मागवल्या आहेत.औद्योगिक आस्थापनांमधील कामगार आणि मालक यांच्यातील संबंधांचे नियमन करणे आणि वेतनाबाबतच्या तरतुदी स्पष्ट करणे, हे या नव्या नियमावलीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या नियमांच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील औद्योगिक वातावरणात पारदर्शकता आणि सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे.

कल्याणकारी मंडळांची स्थापना,कामगार विभागामार्फत कामगारांसाठी विविध कल्याणकारी मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये कोल्हापूर कामगार विभागाच्या कार्यक्षेत्रातील सुमारे १ लाख ३६ हजार ९४० कामगारांची सक्रिय नोंदणी आहे. नोंदणीकृत कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य योजना, आरोग्यविषयक योजना, सामाजिक सुरक्षा योजना व आर्थिक सहाय्य योजना यांद्वारे विविध आर्थिक व वस्तुरूप लाभ दिले जात आहेत.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये कामगारांची सक्रिय नोंदणी केली जात असून, नोंदणीकृत कामगारांपैकी ५५ ते ६० वर्षे वयोगटातील घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेंतर्गत १० हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरेलु कामगारांनी कामगार विभागाकडे नोंदणी करावी, असे आवाहन कोल्हापूरचे सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केले आहे.

विभागाची प्रमुख कार्यालये,कामगार विभागाच्या कार्यक्षेत्रात कामगार आयुक्तालय, असंघटित कामगार विकास आयुक्त कार्यालय, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य निदेशालय, स्टीम बॉयलर्स निदेशालय, महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ तसेच नारायण मेघाजी लोखंडे कामगार विज्ञान संस्था यांसारखी प्रमुख कार्यालये कार्यरत आहेत. ही सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत कामगारांच्या हिताचे रक्षण करत आहेकामगार विभागाच्या वतीने संघटीत व असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे औद्योगिक सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होत आहे. तसेच राज्याच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासात कामगार विभागाचे योगदान अधिकाधिक बळकट होत आहे.

वृषाली पाटील,सहायक संचालक (माहिती)विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

संबंधित पोस्ट

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला – केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह देशातील १५ साखर कारखान्यांना सीएनजी युनिट उभारण्यास प्राधान्य देणार

विमान अपघातातील प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष*

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

परळीत होणार “महापशुधन एक्स्पो २०२५”; ५.८४ कोटीचा निधी मंजूर

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

vishwatmaklokswamivarta

अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही होणार नाही ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*प्रधानमंत्री मोदींची विकासाची गाडी कोणी अडवू शकत नाही*