
दरवर्षीप्रमाणे निलेश सांबरे यांच्याकडून ३०० मोफत बसमधून १५ हजार वारकरी भाविकांना पंढरपूर वारी…
ठाणे (प्रतिनिधी) :आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त समाजसेवक निलेश सांबरे यांच्या पुढाकारातून यंदाही हजारो वारकरी भाविकांसाठी भव्य मोफत पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ३०० मोफत बसमधून सुमारे १५ हजार वारकरी भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे नेण्यात येणार असून, हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लोकसहभागाच्या सामाजिक वारी उपक्रमांपैकी एक मानला जात आहे.
ग्रामीण भागातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच ज्येष्ठ नागरिकांना कोणताही आर्थिक भार न पडता विठूमाऊलीच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम अनेक वर्षांपासून सातत्याने राबविला जात आहे. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेल्या या उपक्रमामुळे दरवर्षी हजारो वारकरी भाविकांना पंढरपूर वारीचा आनंद घेता येत असून, समाजात सेवाभावाचा आदर्श निर्माण झाला आहे.
यंदाच्या वारीसाठी २४ ते २६ जुलै असा तीन दिवसांचा प्रवास कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून बस नियोजित ठिकाणांहून रवाना होऊन तांदुळवाडी येथे पोहोचतील. सर्व भाविकांच्या मुक्कामासाठी एकाच ठिकाणी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली असून, भोजन, पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सेवा, स्वयंसेवक, सुरक्षा व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
२५ जुलै रोजी पहाटे सर्व वारकरी बसने पंढरपूरकडे रवाना होतील. बसस्थानकापासून पायी चालत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेण्यात येईल. दर्शनानंतर भाविकांना पंढरपूरमधील विविध धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर सर्व वारकरी तांदुळवाडी येथे परततील. सायंकाळी आयोजित विशेष कार्यक्रमात निलेश सांबरे वारकरी भाविकांशी संवाद साधतील. त्यानंतर सर्वांसाठी उपवासाच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
२६ जुलै रोजी सकाळी सर्व भाविक नियोजित वेळेनुसार आपल्या गावी परतीच्या प्रवासाला रवाना होतील. संपूर्ण वारीदरम्यान प्रत्येक बससाठी समन्वयक, स्वयंसेवक आणि संपर्क व्यवस्था नियुक्त करण्यात आली असून, भाविकांचा प्रवास सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी होण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ धार्मिक यात्रेपुरता मर्यादित नसून, समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत सेवाभाव पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे. वारकरी परंपरेचे जतन, सामाजिक समरसता आणि लोकसेवा या त्रिसूत्रीचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमामुळे हजारो कुटुंबांना विठ्ठल दर्शनाचा लाभ मिळत आहे.
यंदाही १५ हजारांहून अधिक वारकरी भाविक या मोफत पंढरपूर वारीचा लाभ घेणार असून, समाजसेवा आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे राज्यभरातून स्वागत होत आहे.



