
सुरक्षित आणि शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा करावा – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- सार्वजनिक गणेशोत्सव जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न- ध्वनिप्रदूषण नियम व वेळेच्या मर्यादा पाळण्याचे आवाहन- चार दिवस रात्री 12 वाजेपर्यंत देखावे सुरू राहणार- शांतता व सलोखा राखा, पोलीस, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे
सांगली, प्रतिनिधी: येत्या 14 सप्टेंबरपासून सुरू होणारा गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. हा उत्सव सर्वांनी जबाबदारीने सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा. जिल्ह्यात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांतता, सुव्यवस्था राखावी. सौहार्दपूर्ण वातावरणात, सलोख्याने व उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे केले.
गणेशोत्सव दि. १४ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होत असून, या अनुषंगाने श्री गणेशोत्सव २०२६ जिल्हास्तरीय आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. खरे क्लब हाऊस, येथे आयोजित या बैठकीस महापौर धीरज सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता महापात्र, महावितरणचे अधिक्षक अभियंता अमित बोकिल, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जगदाळे यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, गणेशोत्सवामध्ये ध्वनिक्षेपक, डीजे व इतर ध्वनीवर्धक यंत्रणांचा वापर करताना शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे व वेळेच्या मर्यादांचे काटेकोर पालन करावे. मर्यादेपेक्षा अधिक ध्वनीप्रदूषणामुळे मानवी जीवन तसेच पशु पक्षी यांच्यावर दुष्परिणाम होतात. निसर्गाची साखळी बाधित होते. त्याचबरोबर डॉल्बीच्या सर्वाधिक जवळ मंडळाचे कार्यकर्ते असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होणार आहे, याचे भान गणेशोत्सव मंडळांनी व कार्यकर्त्यांनी ठेवावे, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, उत्सवस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महिला, बालके व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याची दक्षता घ्यावी. गणेशोत्सव कालावधीत 18, 19, 20 आणि 25 सप्टेंबर हे 4 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत देखावे सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. अर्ज केल्यास तर यामध्ये अजून एक दिवस वाढू शकतो, असे सांगून पर्यावरकपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवादरम्यान नशा करू नये. पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन करून राज्य शासनाच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची मुदत 7 सप्टेंबर असून जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.
कायदा व नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, असे स्पष्ट करून पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांवर भर द्यावा. ध्वनीची तीव्रता नियमबाह्य पद्धतीने वाढवू नये. कर्णकर्कश्श आवाजाने नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे पोलीस यंत्रणेकडे उपलब्ध असलेल्या ध्वनीमापक यंत्रांनी आपल्या ध्वनीची मर्यादा तपासावी. डीजे चालक-मालकांनी प्रशासन व पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे. कोणत्याही मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
गणेशोत्सव एकतेचे प्रतीक असून, सामाजिक एकता अखंडित राहील, समाजात दुही निर्माण होणार नाही, यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन करून पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, प्रत्येक गणेशोत्सव मंडळासाठी एक पोलीस अंमलदार समन्वय राखण्यासाठी देण्यात येण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी समन्वय ठेवावा. आपल्या सूचना व अडचणी त्यांच्यामार्फत पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी डायल 112 वर नोंदवाव्यात. या मंगलउत्सवात अपप्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र म्हणाल्या, गणरायाच्या आगमनासाठी खड्डेमुक्त सांगली साठी महानगरपालिकेतर्फे कार्यवाही सुरू आहे. भटक्या जनावरांवर अंकुश ठेवण्यासाठी शासन नियमानुसार प्रयत्न करण्यात येतील. महापालिकेच्या वतीने विसर्जन मार्गावर 10 मोबाईल स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली जातील, असे त्यांनी सांगितले
आयुक्त संजिता महापात्र म्हणाल्या, सांगलीकर नागरिकांनी हरित आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा. गणेशोत्सव मंडळांनी सजावटीमध्ये पर्यावरणपूरक बाबींचा वापर करावा. निर्माल्य आणि मूर्ती विसर्जनासाठी कुंड उपलब्ध करून देण्यात येतील. मूर्तीदानाचाही विचार नागरिकांनी करावा, असे त्या म्हणाल्या.
महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, गणेशोत्सवासाठी सांगली महानगरपालिका सज्ज असून, सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेण्यात येईल. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू, असे ते म्हणाले.
अमित बोकील, राहुल जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी केले. यावेळी गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व नागरिकांनी त्यांच्या सूचना मांडल्या.
00000



