अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा विषयक स्पर्धांचे आयोजन
नवी मुंबई प्रतिनिधी- 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला आणि मराठी भाषेचा गौरव अधिकच वृध्दींगत झाला. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार दि. 3 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही अभिजात मराठी भाषेचा गौरव वाढविणारे व मराठी भाषेच्या अभिजाततेची ओळख करून देणारे विविध उपक्रम महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहेत.
अभिजात मराठी भाषेची व साहित्याची आवड अनेकजण आत्मियतेने जपतात. हे लक्षात घेऊन मराठी भाषेत लिखाण करणा-या नवी मुंबईकर नागरिक तसेच नमुंमपा अधिकारी – कर्मचारी यांचेकरिता ‘मराठी घोषवाक्य / संदेश स्पर्धा’ जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये सहभागी स्पर्धक हे (i) मराठी भाषा संवर्धन, (ii) स्वच्छता, (iii) पर्यावरण, (iv) प्लास्टिक प्रतिबंध, (v) आरोग्य – अशा 5 विषयांवर, प्रत्येक विषयावर 1 घोषवाक्य किंवा जनजागृतीपर काव्यात्म संदेश (चारोळी) मराठी भाषेत पाठवू शकतात. प्रत्येक विषयातील सर्वोत्कृष्ट घोषवाक्यास रू.1000/- किंमतीचे पारितोषिक ग्रंथभेट स्वरूपात देण्यात येईल. यामध्ये नमुंमपा अधिकारी / कर्मचारी यांचा व नवी मुंबईकर नागरिकांचा स्वतंत्र गट व स्वतंत्र पारितोषिके असतील.
अशाच प्रकारचा आणखी एक ‘अभिजात मराठी काव्य सादरीकरण स्पर्धा’ हा अभिनव उपक्रम दि. 09 ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी सकाळी 11.00 वा. पासून आयोजित करण्यात आला असून यामध्ये स्वत:च्या नव्हे तर अभिजात मराठी भाषेतील नामवंत कवींच्या आपल्याला आवडलेल्या एका कवितेचे कमाल पाच मिनीटात सादरीकरण करावयाचे आहे. या काव्य सादरीकरण स्पर्धेच्या माध्यमातून अभिजात मराठी कवितेची समृद्ध परंपरा मांडली जाईल व मराठी भाषेचे वैभव आणि वैविध्यपूर्ण शब्दलालित्य प्रसारित होईल अशी संकल्पना जपण्यात येत आहे. या काव्य सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांस प्रथम : रू. 3000/- किंमतीची ग्रंथभेट, व्दितीय : रू. 2500/- किंमतीची ग्रंथभेट, तृतीय : रू.2000/- किंमतीची ग्रंथ भेट, उत्तेजनार्थ (5 पारितोषिके ) : रू. 1000/- किंमतीची ग्रंथभेट अशा स्वरूपाची पारितोषिके प्रदान करण्यात येतील.
या दोन्ही स्पर्धांमधील सहभागाकरिता दि. 7 ऑक्टोबर 2026 रोजी पर्यंत 9930020814 या संपर्कध्वनी क्रमांकावर नाव नोंदणी करणे आवश्यक राहील. ऐनवेळी स्पर्धा प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घेण्यात यावीअभिजात मराठी भाषेचा गौरव करणा-या व विनामूल्य प्रवेश असलेल्या ‘मराठी घोषवाक्य / संदेश स्पर्धा’ व ‘अभिजात मराठी काव्य सादरीकरण स्पर्धा’ यामध्ये नमुंमपा अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि मराठी भाषाप्रेमी नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.