
राहुल शेवाळे गटनेतेपदी नियुक्त; लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता…
नवी दिल्ली प्रतिनिधी
: एकनाथ शिंदे समर्थक खासदार गटाला आणि राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. आज एकनाथ शिंदे समर्थक खासदारांनी ओम बिर्ला यांची भेट घेऊन नवीन गटनेत्याच्या नियुक्तीबाबत पत्र दिलं होतं
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेचे १२ खासदारांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटात सामील झाल्याची घोषणा केली. तसेच आपण अजुनही एनडीएचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यातच आता शिवसेनेच्या लोकसभेतील एकनाथ शिंदे गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिरवा कंदील दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन विनायक राऊत यांच्या जागी राहुल शेवाळे यांची सभागृहात पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची विनंती केली होती. त्यानुसार लोकसभा अध्यक्षांनी ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते आता राहुल शेवाळे राहणार असून प्रतोद म्हणून भावना गवळी कायम राहणार आहेत



