
राज्यातील विविध भागात दमदार पावसाची हजेरी, हवामान विभागाकडून अलर्ट जारी….
महाराष्ट्र प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काल काही भागात वरुण राजा शांत असला तरी आज पुन्हा एकदा राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रात मध्यरात्री पासुन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने सकाळपासून चांगलाच जोर पकडला आहे. मराठवाडा विदर्भाच्या (Vidarbha) विविध जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असुन हवामान विभागाकडून येलो अलर्ट करण्यात आला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत असुन नद्याकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मध्यरात्री मुंबईत पावसानं हजेरी लावली होती. सकाळपासून मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप बघायला मिळत आहे. ठाणे कल्याण नवी मुंबई भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पुणे (Pune), नाशिक रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग बुलडाणा (Buldhana), परभणी (Parbhani), वर्धा (Wardha), नांदेड (Nanded), अकोला (Akola) या जिल्ह्यात हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील 3,4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही अंदाज वर्तवण्यात आला आहे.



