
मुंबईमध्ये उडत्या कंदीलाचा वापर आणि विक्रीवर बंदी; आदेशाचे पालन न केल्यास होणार कारवाई..
अधिकृत आदेशानुसार, 16 ऑक्टोबरपासून मुंबईत उडत्या कंदीलांचा वापर आणि विक्री 30 दिवसांसाठी प्रतिबंधित असेल. चायनीज कंदील म्हणून समजल्या जाणाऱ्या फ्लाइंग कंदीलांचा वापर, विक्री आणि साठवणुकीवर बंदी 14 नोव्हेंबरपर्यंत लागू असेल.
मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) डीसीपी (ऑपरेशन) संजय लाटकर यांनी 16 ऑक्टोबर 2022 ते 14 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबईत उडते कंदील (Flying Lanterns) उडवण्यास बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, ‘मुंबई पोलिसांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात सध्याच्या परिस्थितीमुळे’ आकाशात उडते कंदील वापरल्याने मानवी जीवन आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.
अधिकृत आदेशानुसार, 16 ऑक्टोबरपासून मुंबईत उडत्या कंदीलांचा वापर आणि विक्री 30 दिवसांसाठी प्रतिबंधित असेल. चायनीज कंदील म्हणून समजल्या जाणाऱ्या फ्लाइंग कंदीलांचा वापर, विक्री आणि साठवणुकीवर बंदी 14 नोव्हेंबरपर्यंत लागू असेल. या आदेशाचे पालन न केल्यास मुंबई पोलीस त्याच्यावर भादंवि कलम 188 अन्वये कारवाई करणार आहेत. यासोबतच मुंबई पोलिसांनी शहरात 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना (योग्य कारणाशिवाय) एकत्र येण्यास बंदी घातली आहे.
मुंबई पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, मुंबईतील शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांना वेगवेगळ्या स्त्रोतांकडून मिळाली आहे. याशिवाय मानवी जीवित व मालमत्तेचे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे मुंबईत दंगल घडू नये आणि सार्वजनिक वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ नये यासाठी 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचा हा आदेश 16 ऑक्टोबर 2022 ते 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत लागू राहणार आहे.



