
राज्यात उद्याही मुसळधार पावसाची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नागरिकांना सावधानता बाळगण्याच्या सूचना. मुंबईला यलो अलर्ट…
मुंबई प्रतिनिधी
२४ तासांपासून मुंबई, कोकण, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. तुरळक अपवाद वगळता या सर्व ठिकाणी पाऊस थोडाही खंड न घेता पडत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे. या सगळ्यामुळे जनजीवन आणि दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी सर्वजण पावसाचा जोर कमी कधी होणार, याची प्रतीक्षा करत आहेत. परंतु, गुरुवारच्या दिवशीही याभागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्राच्या हवामानासंदर्भात काही अंदाज व्यक्त केले आहेत. त्यानुसार २० जुलैला ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उद्याही या सर्व ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज सकाळपासून या सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे. रायगड जिल्हयातील महाड शहरात, तर रत्नागिरीच्या खेडमध्ये नदीचे पाणी शहरात शिरले आहेत. आज रात्रीपर्यंत याठिकाणी पावसाचा जोर कसा राहतो, यावर पुढील परिस्थिती अवलंबून आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चिपळूण आणि रायगडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) पथके तैनात करण्यात आली आहेत.



