
शेतकऱ्यांना घरपोच मिळाली माफक दरात साखर : बैलपोळा सणानिमित्त समृध्दी कारखान्याचा उपक्रम…
अंबड: अंबड प्रतिनिधी
आर्थिक अडचणीत असलेल्या अंबड व घनसावंगी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी बैलपोळा सणानिमित्त समृध्दी साखर कारखान्याने सभासद शेतकऱ्यांना 100 रुपये प्रतीटन प्रमाणे वाढीव तिसरा हप्ता व 25 किलो साखर माफक दरात देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी तीन दिवसापूर्वी याबाबत घोषणा केली होती. या दोन्ही निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे कारखाना प्रशासनाने केली आहे.
ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 100 रुपये प्रतीटन प्रमाणे वाढीव तिसऱ्या हप्त्याची रक्कम 11 सप्टेंबर पासून देण्यात आली. तसेच बैलपोळा सणासाठी शेतकऱ्यांना 25 किलो साखर घरपोच करण्यात आली. संबधीत गटातील गावात कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी ही साखर शेतकऱ्यांना घरपोहच नेऊन दिली. घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव, तिर्थपुरी गटातील गावात मंगळवारी घरपोच साखर वाटप करण्यात आली. तिर्थपुरी गटातील गावात साखर वाटपा प्रसंगी कारखान्याचे शेख जावेद, अर्जुन आंनदे, सखाराम पानखडे, रोहिदास मिसाळ, किशोर खापरे व शेतकरी उपस्थित होते. महत्वाच्या सणासाठी माफक दरात घरपोच साखर मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. या उपक्रमाबद्दल कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी समृध्दी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे आभार मानले.



