vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करावा – उपमुख्यमंत्री

केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करावा – उपमुख्यमंत्री

 

राज्य प्रतिनिधी

प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबविताना आर्थिक शिस्तीचे पालन करावे. त्यादृष्टीने योजना, यंत्रणा व स्वायत्त संस्थांचे सुसूत्रीकरण, अनुत्पादक अनुदानात कपात आणि उत्पादनक्षम भांडवली खर्चात वाढ करण्यासारख्या बाबींची अंमलबजावणी करावी. या माध्यमातून केंद्र शासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात कृषी; अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण; सहकार; मराठी भाषा; शालेय शिक्षण; सांस्कृतिक कार्य; मत्स्यव्यवसाय; वने; पाणीपुरवठा व स्वच्छता; अल्पसंख्याक; पणन; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता; मदत व पुनर्वसन; फलोत्पादन; रोजगार हमी; परिवहन अशा १६ विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ आखणीसंदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ; सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील; सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील; कृषी मंत्री धनंजय मुंडे; मराठी भाषा विभाग तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर; अल्पसंख्याक तथा पणन मंत्री अब्दुल सत्तार; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा; मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील; फलोत्पादन तथा रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे उपस्थित होते.

विभागांच्या वार्षिक योजनांबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, महाराष्ट्रासारख्या लोककल्याणकारी राज्यामध्ये जनहिताच्या दृष्टीने नवनवीन योजना तयार करून नागरिकांना लाभ देण्यात येतो. मात्र, नवीन योजना घेताना बहुतांश वेळा गरज संपलेल्या पूर्वीच्या योजना तशाच सुरु असतात. या योजनांसाठी वर्षानुवर्षे कोणतीही आर्थिक तरतूद केली जात नाही. अशा योजनांचा आढावा घेऊन, त्यांचे विश्लेषण करून कोणती योजना सुरु ठेवावी आणि कोणती बंद करावी याची कारणमिमांसा करणारे प्रस्ताव तयार करावेत. साधारण ५० कोटी रुपयांखालील तरतूद असणाऱ्या योजनांबाबत मंत्री स्तरावर निर्णय घेता येईल. तसेच ५० कोटींच्या वरच्या तरतुदीच्या कालबाह्य योजना रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले की, केंद्र शासनाच्या सहकार्यातून राज्य शासनाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठीचा केंद्र शासनाचा हिस्सा वेळेवर मिळविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे योजनांची अंमलबजावणी करताना १५वा वित्त आयोग, समान विषयास केंद्र शासनाकडून मिळणारा निधी यांचाही वापर करावा. वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्यासाठी अनुदानाच्या रकमा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात याव्यात. राज्य शासनाचे उपक्रम, कार्यक्रम ठरवून दिलेल्या मुदतीपूर्वीच पूर्ण करावेत. जनतेला दिलेली आश्वासने वेळेअगोदर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

संबंधित पोस्ट

लातूर येथील पत्रकार कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादसकारात्मक पत्रकारितेमुळे समाजाला योग्य दिशा- पोलीस अधीक्षक अमोल तांबे· विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजन· कृत्रिम बुद्धिमत्ता, वृत्त संकलन-संपादनाविषयी मार्गदर्शन

कोंकणातील तापमानात वाढ झाल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी   – विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. 

सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी विमा कंपन्यांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत,कर्मचा-यांनी सुधारित वेतन कराराची मागणी

महाकुंभ मेळ्यातून संत-महंतांकडून हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे लोकार्पण ! हिंदु राष्ट्राची राज्यघटना हे रामराज्याचे स्वरूप असेल ! – स्वामी आनंदस्वरूप महाराज, शांभवी पीठाधीश्वर –

vishwatmaklokswamivarta

मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत जिल्हाधिकारीकार्यालयाच्या आवारात साकारली भव्यदिव्य रांगोळी     “ वृध्द असो वा जवान ; अवश्य करा मतदान ”